
रिक्षा असो वा इतर कुठलीही गाडी, प्रवास करताना मुलांची काळजी घेणे ही पालकांचीच जबाबदारी असते, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा देत विक्रोळीच्या न्यायदंडाधिकारी न्यायालयाने बेदरकार ड्रायव्हिंगच्या आरोपातून एका रिक्षाचालकाची निर्दोष मुक्तता केली. घाटकोपरच्या पंतनगरमध्ये झालेल्या अपघाताच्या प्रकरणात न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
पंतनगरच्या नायडू कॉलनी येथून घाटकोपर रेल्वे स्थानकाकडे शेअर ऑटोरिक्षा जात होती. या रिक्षातून कुटुंबीयांसह प्रवास करीत असलेल्या एका लहान मुलाच्या डाव्या पायाला विरोधी दिशेने आलेल्या रिक्षाची धडक बसून गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी मुलाची मावशी रेखा जाधव यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. विरोधी दिशेने आलेल्या रिक्षाच्या चालकाने बेदरकार ड्रायव्हिंग केल्यामुळेच अपघात घडून दुखापत झाल्याचा आरोप त्यांनी केला. त्याआधारे पोलिसांनी रिक्षाचालक भगवान भांबुरेविरोधात बेदरकार ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल केला होता. या अपघाताची विक्रोळीच्या न्यायदंडाधिकारी न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने रिक्षाचालकाच्या निष्काळजीपणाचे पुरावे सादर केले. मात्र प्रवासात मुलाचा पाय रिक्षाच्या बाहेर होता. त्याकडे लक्ष देण्याची पुरेशी काळजी मावशीने घेतली नाही. यातून मावशीचा निष्काळजीपणा दिसून येतो, असे निरीक्षण नोंदवत महानगर न्यायदंडाधिकारी व्ही. के. उमाळे यांनी आरोपी रिक्षाचालकाची निर्दोष मुक्तता केली.
न्यायालय म्हणाले…
- मुंबईसारख्या शहरात ऑटो प्रवाशांनी स्वतःच्या सुरक्षेची काळजी स्वतःच घ्यावी आणि प्रवासात काळजीपूर्वक बसावे.
- रिक्षामध्ये मुलांच्या सुरक्षेसाठी उजव्या बाजूला रॉड बसवणे बंधनकारक आहे. त्यामुळे पालकांनी रिक्षा प्रवासात मुलांना उजव्याच बाजूला बसवले पाहिजे.

























































