संचित – परखड सुनीताबाई!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>दिलीप जोशी

पुलंच्या हसत, खेळत विनोदासोबत स्वत:चा स्पष्टवक्तेपणा जपणाऱया, घरी अगत्याने हसतमुखाने स्वागत करणाऱया प्रेमळ विदुषी सुनीताबाई देशपांडे यांच्या हृद्य स्मृती!

नक्की आठवत नाही, पण बहुधा मुंबईतल्या रवींद्र नाटय़ मंदिरात पु.ल. आणि सुनीताबाईंचं कवी आरतीप्रभू (चिं.त्र्यं. खानोलकर) यांच्या कवितांचं सुश्राव्य वाचन चाललं होतं. पु.ल. तर गायकच, पण सुनीताबाईंच्या काव्यवाचनालाही एक लय होती. कवितेचे भाव त्यातून प्रगट होत होते. पु.ल. एक कविता जरा भरभर वाचू लागले तेव्हा सुनीताबाई म्हणाल्या, “अरे भाई, जरा सावकाश.” श्रोते हसले. पुलंनी एकवार श्रोत्यांकडे आणि मग सुनीताबाईंकडे पाहत म्हटलं, “बरं.. बरं..” आणि कार्यक्रम पुढे सुरू झाला. माझ्या शेजारचा श्रोता उद्गारला, “हेही पुलंचंच दिग्दर्शन अस-णार…” खरं तर तसं काही नसावं, पण कालांतराने सुनीताबाईंचं ‘आहे मनोहर तरी’ या आत्मकथनात त्या एकदा गाडी चालवत असताना शेजारी बसलेल्या पुलंना पाहून खेडय़ातला मुलगा मित्रांना म्हणाला, “…अरे, गाडी शिकिवनारा बाबा हाय सोबत” (म्हणजे घाबरू नका). हा किस्सा वाचताना मला त्या शहरी श्रोत्याची आठवण आली. सुनीताबाईंनी त्यांच्या आणि पुलंच्या सहजीवनाविषयी आत्मकथनात अतिशय परखडपणे लिहिलंय. त्यात आत्मदोषही सांगण्याइतका नि:पक्षपातीपणा त्यांनी दाखवलाय.

…पण पुलंच्या ‘हसत खेळत, विनोद फुलवत वावरण्याच्या पार्श्वभूमीवर सुनीताबाईंचा स्पष्टपणा अनेकांना ‘जाचक’ वाटला. मला मात्र तसा अनुभव अजिबात आला नाही. मला भेटलेल्या, फोनवर बोललेल्या सुनीताबाई एक प्रेमळ विदुषी भासल्या. त्यांची पहिली भेट झाली ती पुण्याच्या ‘सरहद्द’ संस्थेचे संजय नहार यांनी काही अनाथ कश्मिरी मुलांना महाराष्ट्रात बोलावलं तेव्हा. या मुस्लिम मुलांचे पालकही अतिरेक्यांच्या हल्ल्यात मारले गेले होते. या मुलांना हा देश आपला वाटावा, कश्मीरात सौहार्द निर्माण व्हावं असा ‘सरहद्द’चा प्रयत्न होता. मुंबईत ‘चित्रलेखा’चे संपादक ज्ञानेश महाराव यांनी त्यांचा कार्यक्रम आखला होता. त्यापैकी नेहरू तारांगण दाखवण्याची जबाबदारी आमच्या खगोल मंडळाकडे आली. त्या कार्यक्रमाला गोपीनाथराव मुंडे उपस्थित होते. मुंबईचे महापौर हरेश्वर पाटील यांनीही या मुलांना बोलावलं होतं. फिल्म स्टुडिओत काही अभिनेत्यांची आणि त्यांची भेटही घडवली.

हा कार्यक्रम आटपून ही मुलं पुण्याहून जम्मूला जायची होती. आमच्या मनात आलं, त्यांची आणि पुलंची भेट झाली तर… ही 12 डिसेंबर 1999ची गोष्ट. पु.ल. व्हीलचेअरवर होते. सुनीताबाई परवानगी देतील का? असाही प्रश्न होता. मात्र, सुनीताबाईंनी सर्वांचं हसतमुखाने स्वागत केलं. त्यांना दिलासा दिला. शेवटी पुलंसह सर्वांनीच ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा’ हे गीत म्हटलं. वातावरण भारावून गेलं होतं. पु.लं.चा आवाज खोल गेला असला तरी ते उत्सुकतेने सारं अनुभवत होते. “आधी तुमचं घर छोटं होतं. आता ते खूप मोठं झालंय” असं ते त्या मुलांना म्हणाले. या हृद्य उद्गारांनी सारे गहिवरले. सुनीताबाईंनी मुलांना म्हटलं, “धीर धरा. यापुढे चांगला काळ निश्चित येईल.” या अद्वितीय अनुभूतीचं काही चित्रण अस्पष्ट स्वरूपात पण उपलब्ध आहे हे महत्त्वाचं.

नंतर बरोबर सात महिन्यांनी पु.ल. 12 जून 2000 या दिवशी गेले. 54 वर्षांपूर्वी याच तारखेला (1946) सुरू झालेलं एक संपन्न सहजीवन संपलं. सुनीताबाईंनी हे दु:ख नेहमीच्याच धैर्यानं सोसलं. 12 डिसेंबरच्या कार्यक्रमाचे फोटो त्यांना द्यायचे होते म्हणून तीनेक महिन्यांनी त्यांना फोन केला. “या, पण फार वेळ नाही देता येणार” त्या म्हणाल्या. मी आणि मित्र प्रदीप आम्ही त्यांच्या घरी गेलो. भिंतीवरच टागोरांचं पेन्टिंग आणि त्यावरची चित्रकर्तीची ‘नंदिता’ अशी सही पाहून मी प्रश्न केला आणि सुनीताबाईंनी तो सारा किस्सा सविस्तर सांगितला. आम्ही खगोल अभ्यासकही आहोत हे कळल्यावर “तुमच्या नारळीकरांच्या ‘आयुका’लाच देणगी द्यायचं ठरवलंय” असं म्हणाल्या. तेवढय़ात एक फोन आला. तो त्यासंबंधीच होता. “झालं काम” असं त्या बोलल्या आणि त्यांच्या देणगीतून पुण्याच्या ‘आयुका’मध्ये ‘पुलस्य’ म्हणजे पुलंचं आणि सप्तर्षी तारकासमूहातील एका ताऱयाचं कल्पक नाव असलेली वास्तू उभी राहिली.

आपल्या परखड स्वभावाविषयी सुनीताबाईंनी त्यांच्या आत्मकथनात  लिहिलंच आहे. स्वतंत्र विचार आणि व्यक्तिमत्त्वाच्या सुनीताबाई ‘वंदे मातरम्’ चित्रपटात पुलंच्या नायिका होत्या. पुलंच्या नाटकांमध्येही त्यांनी कामं केली, पण नंतर अभिनय सोडून संसार सांभाळला. ‘पु.ल. देशपांडे फाऊंडेशन’ची स्थापना करून लाखो रुपयांचं ‘सत्पात्री’ दान केलं, ते अजिबात गवगवा न करता. या दांपत्याने जगप्रवास केला. ही त्यांची आणखी एक समान आवड.

…पण त्या भेटीत सुनीताबाईंनी सांगितलेली हृद्य घटना आठवते.  रस्त्याच्या कडेला एकदा कारमधून जाताना त्यांना कचऱयातले केवळ कागद गोळा करणारी बाई दिसली. सुनीताबाईंनी तिची चौकशी करून घरचा पत्ता दिला आणि त्यांच्याकडे प्रचंड टपालातून येणाऱया अनेक कागदांची नंतर होणारी रद्दी (पत्रांच्या वेष्टनांची) घेऊन जायला सांगितलं. सुनीताबाई हे सहज सांगत होत्या. त्यांच्या स्वभावातील सहृदयता जाणवत होती. ‘तो’ श्रोता पुन्हा भेटला असता तर त्याला सांगितलं असतं, इथं दिग्दर्शन करायला पु.ल. नव्हते. या दांपत्याची ती जीवनधारणाच होती. उद्या सुनीताबाईंची जयंती. त्यानिमित्त या आठवणी.

[email protected]