संसदेत गदारोळात दोन विधेयके चर्चेविना मंजूर

बिहारमधील मतदार याद्यांच्या फेरतपासणीवर सविस्तर चर्चेची मागणी करत विरोधकांनी आज सलग 23 व्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांत गदारोळ केला. या गोंधळातच लोकसभेत मर्चंट शिपिंग विधेयक 2024 आणि राज्यसभेत समुद्राद्वारे मालवाहतूक म्हणजेच कॅरीएज गुड्स बाय सी 2025 ही दोन विधेयके सरकारने चर्चेविना मंजूर केली.

बिहारमधील मतदार याद्यांच्या फेरतपासणीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे, त्यामुळे यावर चर्चा होऊ शकत नाही, असे संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी स्पष्ट केले. त्यामुळे विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत सभागृह दणाणून सोडले. संसदेच्या दोन्ही सभागृहांत कामकाज सुरू होताच विरोधकांनी गदारोळ सुरू केला. लोकसभेत गदारोळामुळे प्रश्नोत्तराचा तास होऊ शकला नाही. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज 12 वाजेपर्यंत स्थगित केले. त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांनी पुन्हा एसआयआरप्रकरणी चर्चेची मागणी लावून धरत गदारोळ केला. त्यामुळे लोकसभेचे कामकाज 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले, तर राज्यसभेचे कामकाजही स्थगित करावे लागले.

मल्लिकार्जुन खरगे उपसभापतींवर भडकले

राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे उपसभापती हरिवंश यांच्यावर भडकले. खरगे यांनी त्यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केला. विरोधकांनी जेव्हा औचित्याचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला तेव्हा सभागृहात त्यासाठी परवानगी देणार नाही असे उपसभापती म्हणाले, मात्र सत्ताधारी पक्षाचे सदस्य भाषण देत आहेत आणि तुम्ही त्यांना परवानगी देत आहात, अशा शब्दांत खरगे यांनी सुनावले. यावर सभागृह नेते जेपी नड्डा यांनी खरगे यांना विरोध करत उपसभापतींचा आदेशच अंतिम असेल असे सांगितले. त्यामुळे विरोधकांनी सरकारच्या दडपशाहीविरोधात घोषणाबाजी केली. अखेर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.

संसद परिसरात विरोधकांची निदर्शने

मतदारांची नावे हटवू नका, चर्चा हवी अशी मागणी करत विरोधकांनी आज संसद परिसरात निवडणूक आयोग आणि सरकारविरोधात निदर्शने केली. सत्ताधारी इतके कमजोर झालेत की ते ट्रम्प यांचा सामनाही करू शकत नाहीत आणि सभागृहदेखील चालवू शकत नाहीत, असा टोला काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी लगावला. आमचा प्रश्न ते पाच मिनिटांत सोडवू शकतात. आम्ही केवळ मतदार याद्यांच्या फेरतपासणीच्या मुद्दय़ावर चर्चेची मागणी करत आहोत, हे खूप सोपे आहे, असेही त्या म्हणाल्या.