450 कोटींच्या घोटाळ्यातील फिर्यादीच निघाला आरोपी

सुपा (ता. पारनेर) पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सुमारे 450 कोटी रुपयांच्या ‘ट्रेड इन्व्हेस्टमेंट’ कंपनी फसवणूक प्रकरणाला धक्कादायक कलाटणी मिळाली आहे. ज्याने सुरुवातीला फिर्याद दाखल केली तो एजंट विनोद बबन गाडीळकर याच्यासह कुटुंबातील तिघे आता संशयित आरोपी ठरले आहेत. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशानंतर दाखल गुह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांनी न्यायालयासमोर ही धक्कादायक माहिती दिली. विनोद गाडीळकर याच्यासह विक्रम बबन गाडीळकर, पूजा विक्रम गाडीळकर व प्रमोद बबन गाडीळकर अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

गाडीळकर कुटुंबाने स्वतः गुंतवणूक करून थांबले नाहीत, तर इतर गुंतवणूकदारांना प्रलोभन देऊन पैसा गुंतवण्यास भाग पाडले. परिणामी हजारो गुंतवणूकदारांचे कोटय़वधी रुपये अडकले. कंपनीने शेअर बाजारात गुंतवणूक करून दरमहा 10 ते 15 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले. पंचतारांकित हॉटेलांत सेमिनार्स, प्रेझेंटेशन्स, बनावट सेबी परवाने आणि बँक खात्यांचे दाखले वापरून गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला. गाडीळकर याला इतरांना गुंतवणूक जोडल्यास 50 टक्के नफा देण्याचे वचन देण्यात आले. त्याने स्वतः 5 लाख 10 हजारांची गुंतवणूक करून आपल्या मित्रपरिवारालाही यात ओढले. सुरुवातीला परतावा वेळेवर मिळत होता. मात्र, नोव्हेंबर 2024 पासून तो कमी होत गेला आणि मे 2025 मध्ये केवळ 1.8 टक्क्यांवर आला. दरम्यान, एप्रिल 2025 पासून गुंतवणूकदारांच्या परवानगीशिवाय सर्व खाती आयएफ ‘ग्लोबल ट्रेडिंग लिमिटेड’ या नव्या पोर्टलवर स्थलांतरित करण्यात आली. गुंतवणुकीची रक्कम यूएसडीटीमध्ये शिफ्ट करून मोठय़ा प्रमाणात फसवणूक करण्यात आल्याचे पोलीस तपासातून स्पष्ट झाले आहे.

गाडीळकरचा प्रयत्न फसला

– गाडीळकरने फिर्याद दिल्यानंतर नवनाथ जगन्नाथ अवताडे याच्यासह सीईओ अगस्त मिश्रा, संचालक राहुल काळोखे, गौरव सुखदेवे, प्रसाद कुलकर्णी, सचिन खडतरे, चेतन धर, ययाती मिश्रा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, स्वतः या प्रकरणात संशयित ठरू शकतो हे विनोद गाडीळकर याच्या लक्षात येताच त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. मात्र, तपासी अधिकारी निरीक्षक डॉ. गोर्डे यांनी न्यायालयात सविस्तर मांडणी करून गाडीळकर व कुटुंबीयांनाही संशयित आरोपी मानण्याची गरज अधोरेखित केली आणि चौघांना संशयित आरोपी करण्यात आले.

एजंट तितकेच जबाबदार

– या प्रकरणात सर्वांत मोठा धक्का म्हणजे, ज्याने न्यायालयात धाव घेऊन 450 कोटींच्या फसवणुकीचा पर्दाफाश केला, तोच फिर्यादी अखेरीस संशयित आरोपीच्या पिंजऱयात सापडला. अशा प्रकारच्या आर्थिक घोटाळ्यांत फक्त मुख्य कंपनी नव्हे; तर नेटवर्क तयार करून इतरांना गुंतवणूक करायला भाग पाडणारे एजंटदेखील तितकेच जबाबदार असतात, हे या तपासातून स्पष्ट झाले आहे.