पार्थ नाराज झाला असेल तर विसरून जाईल – विजया पाटील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पार्थ यांना वैयक्तिक भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. आजोबा सार्वजनिक ठिकाणी बोलल्यामुळे पार्थ हा नाराज झाला असेल मात्र तो विसरूनदेखील जाईल. पार्थ हा आमच्या घरातील सगळ्यात समजूतदार आहे, अशी प्रतिक्रिया पार्थ पवार यांच्या आत्या विजया पाटील यांनी दिली आहे.

पार्थ पवार यांनी सुशांतसिंह प्रकरणात केलेल्या विधानामुळे उलटसुलट तर्क लावले जाऊ लागले. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर पार्थ यांनी आपले काका आणि आत्या यांच्याशी चर्चा करुन योग्य निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे. यावर आत्या विजया पाटील म्हणाल्या, आजोबांना नातवाला रागावण्याच्या पूर्ण अधिकार आहे. सगळ्यांच्याच घरी वडिलधारी माणसं समजावत असतात. मात्र शरद पवारांना असं रागवताना पहिल्यांदाच पाहिले आहे.

परिस्थिती हाताळण्यात पवार कुटुंब सक्षम

पार्थ हा अतिशय समजूतदार आहे आणि सध्या जी काय परिस्थिती आहे ती हाताळण्यासाठी पवार कुटूंब सक्षम आहे. मुळात इतका विषय वाढवण्याचीच काही गरज नव्हती. पार्थ हा आता सगळे काका आणि आत्या यांच्याशी बोलणार आहे. अजून तरी पार्थ यांचा फोन आला नाही. पण तो सुप्रियाताई सुळे यांच्याशी बोलला. त्या तर पार्थची सगळ्यात आवडती आत्या आहेत.

सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करेल – बाळासाहेब थोरात

महाविकास आघाडी सरकार पडेल, हे दिवास्वप्न भाजप पाहात आहे. मात्र, ते स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. त्यांची भविष्यवाणी खरी ठरणार नाही. महाविकासआघाडी सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करेल, असा विश्वास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. उगाच कुणी भविष्यवाणी वर्तवून आपली शोभा करून घेऊ नये, असेही ते म्हणाले.

तो विषय आमच्या कुटुंबातला – रोहित पवार

शरद पवार यांनी पार्थबाबत केलेले विधान हा आमच्या कुटुंबातील  विषय आहे. अन्य कुणी यात पडण्याचे कारण नाही, असा टोला, आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या नेत्यांना लगावला आहे. दरम्यान, सुशांतिंसह प्रकरणात राजकारण केले जात आहे, असे मी सुरुवातीपासूनच बोलत आलो आहे. आता ते हळूहळू खरे होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील भाजपच्या एका मोठ्या नेत्याला बिहार निवडणुकीत प्रभारी म्हणून सूत्रे दिली जाणार आहेत, त्यामुळे भाजप सुशांत प्रकरणावर इतका आवाज का उठवीत आहे, हेसुद्धा स्पष्ट होऊ लागले आहे. याला बिहार निवडणुकीचे कनेक्शन असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

आमच्यातला एकही आमदार फुटणार नाही – हसन मुश्रीफ

‘भाजपचे नेते काहीही म्हणू द्या. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करणार आहे. आमच्यातला एकही आमदार फुटणार नाही. आणि असे काही झाले तर तो पुन्हा निवडून येणार नाही,’ असा विश्वास ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.