प्रवासी गैरवर्तन प्रकरण, एअर इंडियाच्या एचआर पॉलिसीत मार्चपासून बदल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एअर इंडियाच्या विमानात प्रवाशांकडून वारंवार होत असलेल्या गैरवर्तनाची गंभीर दखल घेत कंपनी आपल्या एचआर पॉलिसीत मार्चपासून बदल करणार आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांशी जबाबदारीने कसे वागावे आणि सर्वोत्तम कामगिरी कशी करावी, यासाठी एअर इंडियाची मालकी असलेल्या टाटा समूहाकडून पावले उचलली जाणार आहेत. दरम्यान, प्रवासावेळी दुसऱ्या प्रवाशावर लघुशंका करणे आणि शौचालयात धूम्रपान केल्याप्रकरणी डीजीसीएने एअर इंडियाला कारणे द्या नोटीस बजावली आहे.

कोटय़वधींच्या कर्जाखाली असलेल्या सरकारी कंपनी एअर इंडियाला टाटा समूहाने काही महिन्यांपूर्वी खरेदी केली. खरेदी केल्यानंतर त्यात काही महत्त्वाचे बदल करण्याचे संकेत टाटा समूहाने दिले होते. कोणतीही नोकर कपात न करता टाटा समूह नवीन धोरण राबवत आहे. यात आता एअर इंडियातून प्रवास करणाऱया प्रवाशांच्या गैरवर्तनाबद्दलचे काही महत्त्वाचे बदल केले जाणार आहेत. दरम्यान, केंद्र सरकारकडून टाटा समूहाने एअर इंडिया खरेदी करण्याच्या कराराला अजून एक वर्ष पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पूर्वीच्या केंद्र सरकारच्या धोरणात टाटा कंपनीला बदल करता येत नाही. मार्च 2023 मध्ये नव्या आर्थिक वर्षापासून टाटा समूहाला स्वतःचे सरसकट धोरण राबवता येणार आहे. त्यावेळीच नवीन धोरण आणि नियम कंपनीला राबवता येणार आहेत.

एअर इंडियात गैरवर्तन सर्वाधिक

इतर विमान कंपन्यांच्या तुलनेत एअर इंडियात प्रवाशांचे सहप्रवाशांशी आणि कर्मचाऱयांशी गैरवर्तन सर्वाधिक आहे. इंडिगोत 0.1, गो फस्ट 0.1, विस्तारा 0.1, एअर आशिया इंडिया 0.1, स्पाईस जेट 0.2, आकासा एअर 0.6 तर एअर इंडियात 1.7 इतके गैरवर्तनाचे प्रमाण आहे.

अशा घडल्या घटना  

  • 26 नोव्हेंबर 2022 ला न्यूयॉर्कवरून दिल्लीला येणाऱया एअर इंडियाच्या विमानात एका पुरुष प्रवाशाने सहप्रवासी असलेल्या महिला प्रवाशांवर लघुशंका केली.
  • 8 डिसेंबर 2022 ला पॅरिसवरून दिल्लीला येणाऱया विमानातीत सहप्रवाशाने बाजूच्या प्रवाशाच्या ब्लँकेटवर लघुशंका केली तसेच शौचालयात जाऊन धूम्रपानही केले.