मुंबई अग्निशमन दलातील पदोन्नतीचा मार्ग मोकळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई अग्निशमन दलातील कर्मचारी आणि अधिकाऱ्याच्या प्रलंबित मागण्यांबाबत ‘मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार संघटना’ आणि प्रमुख अग्निशमन अधिकाऱयांची बैठक पार पडली. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसह विविध जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. यावेळी पदोन्नतीचा प्रस्ताव मंजुरीकरिता पाठवण्यात आला असून मेअखेरपर्यंत त्यावर निर्णय होण्याची शक्यता अधिकाऱयांनी वर्तवली. त्यामुळे अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या मार्ग मोकळा झाला आहे.

प्रमुख अग्निशमन अधिकारी आंबुलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत संघटनेचे अध्यक्ष बाबा कदम आणि सरचिटणीस व विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, संघटनेचे कार्याध्यक्ष प्रशांत तळेकर, मिलिंद वळंजू आणि उपप्रमुख अधिकारी सावंत, भोर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी किशोरी पेडणेकर यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्या अधिकाऱ्यांसमोर प्रखरपणे मांडल्या. 2006 च्या बॅचची सेवाज्येष्ठता मंजूर करून चालक-यंत्रचालक व प्रमुख अग्निशामक यांची रिक्त पदे मेअखेरपर्यंत पदोन्नतीने भरण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. तसेच दुय्यम अधिकारी पदाच्या रिक्त जागांसाठीचा प्रस्तावही त्वरित पाठवण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले.

 अन्य विषयांवर सविस्तर चर्चा

बैठकीदरम्यान पदोन्नतीसह विभागातील रिक्त पदे, गाडय़ांच्या संख्येनुसार दुय्यम अधिकारी पदामध्ये वाढ, पोलीस भरतीच्या धर्तीवर अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना भरती प्रक्रियेत 5 टक्के आरक्षण, 10-20-30 वर्षांच्या सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ, नवीन कर्मचाऱ्यांना तातडीने पीपीई किट आणि गणवेश उपलब्ध करून देणे, जड सेफ्टी शूजऐवजी हलक्या वजनाचे दर्जेदार चामडय़ाचे बूट उपलब्ध करणे, जोखीम भत्त्यात वाढ करणे अशा विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.