
भाच्याच्या घरी चोरी करणाऱया मामाला पोलिसांनी अटक करत त्याच्याकडून चोरलेल्या ऐवजातील काही रक्कम हस्तगत केली आहे. राजू कांतीलाल मोरे (वय 55, रा. सटवाईतांडा, जि. जालना) असे अटक केलेल्या मामाचे नाव आहे. विक्रम भाईलाल जाधव (वय 23, सध्या रा. माळीबाभूळगाव, ता. पाथर्डी, मूळ रा. चिचविरतांडा, जि. नाशिक) यांनी फिर्याद
दिली आहे.
विक्रम भाईलाल जाधव यांच्या राहत्या घरी 28 डिसेंबरला चोरीची घटना घडली होती. जाधव यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील सोन्या व चांदीचे दागिने व 85 हजार रुपयांची रोकड असा एक लाख 45 हजारांचा ऐवज चोरीस गेला होता. जाधव यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस तपासात ही चोरी आरोपी राजू मोरे याने केल्याचे निष्पन्न झाले. मोरे याला पोलिसांनी अटक केली असून, त्याने सोन्या-चांदीचे 60 हजारांचे दागिने व दहा हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 70 हजारांचा ऐवज पोलिसांना काढून दिला.
पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकांत डांगे, सचिन लिंमकर, पोलीस नाईक संदीप कानडे, ज्ञानेश्वर रसाळ, कृष्णा बडे, दत्तात्रेय बडदे, संदीप बडे यांनी ही कारवाई केली.

































































