
बिहारच्या पाटणामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी एका व्यक्तीला स्वतःच्या मुलाच्याच हत्येप्रकरणी अटक केली आहे. तसेच पोलिसांनी हत्येची सुपारी घेणाऱ्या दोघांना अटक केली आहे. मुलाच्या अडेलतट्टू आणि उद्धट वर्तनाने कंटाळून वडिलांनीच मुलाच्या हत्येची सुपारी दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
पाटणातील गौरीचक कोळी गावाजवळ 26 जुलैला एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. सैदनपूरच्या अंकितचा तो मृतदेह असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. तरुणाचा मृतदेह आढळल्याने त्याच्या कटुंबियांनी गोंधळ घातला होता. तरुणाचा मृतदेह पोलीस ठाण्यात नेत आरोपीला अटक करण्याची मागणी करत कटुंबियांनी रास्ता रोको केला होता.
पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली होती. तपासात उघडकीस आलेल्या गोष्टीमुळे पोलिसांनाही धक्का बसला आहे. या तरुणाची हत्या त्याच्या वडिलांनीच केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी संशयावरून गोपालपूरमधील नीतीश पासवानला अटक करून त्याची चौकशी केली. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अंकितचे वडील विनय सिंह यांनीच आपल्याला अंकितची हत्या करण्याची सुपारी दिली होती. त्यासाठी त्यांनी 85 हजार रुपये दिल्याचेही पासवान याने सांगितले.
अंकितच्या हत्येचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी अंकितचे वडील विनय सिंह यांच्यासह तीन जणांना अटक केली आहे. तर इतर दोघे फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. विनयच्या अडेलतट्टू आणि उद्धट वर्तनाने घरातील कुटुंबिय त्रस्त होते. तो कटुंबियांना मारहाणही करत होता. तसेच तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा होत होता. त्यामुळे त्याची हत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे विनय सिंह यांनी सांगितले.
या प्रकरणी अटक केलेल्या तीन आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच हत्येसाठी वापरण्यात आलेली शस्त्रे, विनय सिंह यांनी हत्येसाठी आरोपींना दिलेले पैसे, हत्येसाठी विकत घेतलेली बाईक आणि चार मोबाईल जप्त करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले. या तीन आरोपींची रवानगी तुरुंगात करण्यात आली असून फरार दोन आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.




























































