दुष्काळाचा फटका दुध व्यवसायाला, शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मोडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पाटोदा

तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे दैनंदिन 9 हजार लिटर दूध संकलन घटले आहे. याचा तालुक्याच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम झाला आहे. राज्य सरकारने दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान बंद केल्याने शेतकर्‍यांसाठी दूध व्यवसाय तोट्याचा व्यवसाय ठरला आहे. पाटोदा तालुका हा कायम दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. यावर्षी ऑक्टोबर महिन्यापासून तालुक्यात चार्‍याची टंचाई भेडसावू लागली.चार्‍याअभावी शेतकर्‍यांनी आपली जनावरे वैरणीची व्यवस्था नसल्याने कवडीमोल किमतीला विकून टाकल्याने तालुक्याचे पशुधन कमी झाले. एकेकाळी याच तालुक्यात दरदिवशी सुमारे 25 ते 30 हजार लिटर दुध संकलन होत होते. सततच्या दुष्काळामुळे गेल्या काही वर्षांपासून दुध उत्पादन कमी होत आहे. सध्या तालुक्यातील दूध संकलन तब्बल 5 ते 9 हजार लिटरने घटल्याचे दूध संकलन केंद्रांकडून सांगितले जाते.

तालुक्यात महेश दुध संघ,रामकृष्ण बांगर यांचा दुध संघ,सह्याद्री दुध संघ अशा काही खाजगी संस्थां दुध संकलन करीत आहेत. या सर्व संस्थांच्या दुध संकलनात गेल्या काही दिवसांपासून दररोज घट होत असून सध्या दररोज 5 ते 9 हजार लिटर दुध संकलन कमी होत आहे. फेब्रुवारीपासून चारा छावण्या सुरू झाल्या असत्या तर तालुक्याच्या दूध संकलनात घट झाली नसती. तालुक्यात एकुण 57 हजाराच्या आसपास पशुधन आहे. त्यामध्ये 35 हजारच्या आसपास गाई आहेत तर 14 हजार म्हशीचा समावेश आहे.

गेल्या सहा महिन्यात अनेक पशुपालकांनी आपली जवळपास दोन हजारापेक्षा जास्त जनावरे विकली आहेत. दुध उत्पादन खर्चाच्या तुलनेत दुधाला न मिळणारा दर, अपुरी पशुवैद्यकीय सेवा, पशुखाद्याचे दररोज वाढणारे दर, वैरणीचा पाण्याचा प्रश्न या सर्वांचा परिणाम दूध संकलन घटले आहे. ऐन दुष्काळात शासनाकडून वेळेवर मदत मिळाली नाही. चारा छावण्या तब्बल 4 महिने उशिरा सुरू केल्या. तोवर शेतकर्‍यांना अर्थिक भुर्दंड सहन करून जनावरे पोसावी लागली. उत्पादन व खर्च यांचा मेळ बसत नसल्यामुळे दुष्काळी पट्ट्यातील दूध व्यवसाय अडचणीत आला आहे. दुग्ध व्यवसायाच्या आधारेने अनेक गावे आपले अस्तित्व टिकवून आहेत. मात्र खात्रीचा दुग्ध व्यवसाय मोडून पडत असल्यामुळे गावेच्या गावे भविष्यात ओस पडतील अशी भीती व्यक्त होत आहे.