पत्रीपूल मिशन पार्ट 2 – 77 मीटर गर्डर लाँचिंगसाठी आजपासून तीन दिवस मेगाब्लॉक

कल्याणच्या पत्रीपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील 76 मीटर लांबीचा गर्डर लाँचिंग यशस्वी झाल्यानंतर आता पुलाच्या सर्वात मोठय़ा अशा 77 मीटर लांब वेब गर्डर लाँचिंगसाठी 27 ते 29 नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वेवर सलग तीन दिवस प्रत्येकी तीन तासांचे मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पत्रीपूल मिशन पार्ट 2 साठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

पत्रीपुलाचा सर्वात कठीण आणि तितकाच महत्त्वाचा टप्पा पूर्णत्वाला जात आहे. त्यामुळे डिसेंबरअखेर पूल वाहतुकीसाठी खुला होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे वाहतूककोंडी कायमची निकाली निघणार आहे. पत्रीपुलाच्या अवाढव्य 700 टन वजन, 76 मीटर लांब, 11मीटर उंच गर्डर टाकण्याचे काम सोमवारी पूर्ण झाले. यानंतर आता रेल्वे ओव्हर ब्रिजसाठी रेल्वे रुळांवर 77 मीटर लांबीचे ओपन वेब गर्डर उभारण्यासाठी ट्रफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. 27 ते 29 नोव्हेंबर या काळात पहाटे दोन ते पाच वाजेपर्यंत कल्याण-डोंबिवली या रेल्वे मार्गावर रेल्वे वाहतूक बंद राहणार आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी या दिवशी केडीएमटीची बस सेवा सुरू राहणार आहे. डोंबिवली येथील बाजीप्रभू चौक आणि कल्याण रेल्वे स्टेशनसमोर बस उपलब्ध असणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या