
सामना ऑनलाईन । कल्याण
ब्रिटिशांनी उभारलेला कल्याण पूर्व पश्चिम शहराला जोडणारा जुना पत्री पूल धोकादायक झाल्याने अखेर वाहतुकीच्या व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रविवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास पुल पाडण्यास सुरूवात झाली. अत्याधुनिक महाकाय क्रेन नियोजनबद्ध सज्ज करून अकरा वाजून बारा मिनिटाने या पुलाच्या लोखंडी स्ट्रक्चरच्या गार्डरचा पहिल्या टप्प्यातील पूर्वेच्या दिशेला असलेला ६० टनाचा स्पॅनचा अर्धा भाग उचलण्यात आला, तर दुसरा टप्प्यात पश्चिमेच्या दिशेला असलेला ५० टनाचा स्पॅनचा अर्धा भाग ११ वाजून ५६ मिनिटांनी उचलण्यात आला.
अवघ्या ४४ मिनिटाच्या कालावधीत पुलाचा लोखंडी सांगाडा रेल्वे रुळावरून वेगळा करीत अवघ्या दीड तासाच्या कालावधीत पुलाचे दोन्ही गर्डर दोन्ही बाजूच्या रेल्वेच्या मोकळ्या जागेत उचलून ठेवण्यात आले व मिशन ए पत्री पूल कामगिरी फत्ते केली. त्यानंतर रेल्वेने २५ हजार व्होल्टच्या वाहिन्याचे काम सुरु केले. पत्री पूल हटवल्यानंतर रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली. ब्रिटिश कालीन पत्री पुलाला अखेरचा निरोप देण्यासाठी कल्याण डोंबिवलीतील हजारो नागरिकांनी उपस्थित राहून पुलाच्या पाडण्याचे काम पाहण्यासाठी एकाच गर्दी केली होती.































































