
आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे 2022मध्ये कर्मचारी कपात सुरू केलेल्या पेटीएमच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. त्यामुळे देशातील सर्वात मोठय़ा डिजिटल प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या या कंपनीने तब्बल एक हजारांहून अधिक कर्मचाऱयांना कामावरून काढून टाकले आहे. पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशनने ही कर्मचारी कपात केली आहे. दरम्यान, चालू आर्थिक वर्षात पेटीएम कर्मचाऱयांच्या खर्चात 10 ते 15 टक्क्यांची कपात करणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पेटीएमने कर्मचारी कपात सुरू केली आहे. येत्या वर्षभरात नवीन टॅलेंटला संधी देण्यात येणार असल्याचे कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी म्हटले आहे.
आरबीआयच्या कारवाईचाही परिणाम
रिझर्व्ह बँकेने असुरक्षित कर्जांवर नियामक निर्बंध लादले होते. त्याचाही पेटीएमच्या व्यवसायावर परिणाम झाला. पेटीएमने छोटे तिकीट ग्राहक कर्ज बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कंपनी तोटय़ात गेली आणि कर्मचारी कपात करावी लागली ही बाबही समोर आली आहे.
जुलै-सप्टेंबरमध्ये पेटीएमचा निव्वळ तोटा जवळपास निम्म्याने कमी होऊन 292 कोटी रुपये इतका झाला. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ तोटा 571.5 कोटी रुपये इतका होता.
पेटीएमचे शेअर्स 28 टक्क्यांनी घसरले
कंपनी शेअर बाजारातही तग धरण्यासाठी प्रचंड संघर्ष करत असल्याचे चित्र आहे. कंपनीचे शेअर्स गेल्या महिनाभरात जवळपास 28 टक्क्यांनी घसरले आहेत. गेल्या सहा महिन्यांत शेअर्सची किंमत 23 टक्क्यांनी घसरली आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला पेटीएमच्या शेअर्सना 20 टक्के लोअर सर्किटचा सामना करावा लागला होता. आता कर्मचारी कपातीच्या बातम्या समोर येत आसल्याने शेअर्सवर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे.

























































