शिक्षण संस्थांमधील पीसीआर टेस्ट मशिन्स जवळच्या रुग्णालयांना द्या! ‘यूजीसी’ने दिले निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उच्च शिक्षण आणि संशोधन संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या आरटी-पीसीआर टेस्ट मशिन्स जवळची जिल्हा रुग्णालये आणि सरकारी प्रयोगशाळांना देण्यात याव्यात असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिले आहेत.

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत चाचण्या वाढवण्याची गरजही निर्माण झाली आहे असे यूजीसीचे सचिव रजनीश जैन यांनी म्हटले आहे. उच्च शिक्षण आणि संशोधन संस्थांमध्ये आरटी-पीसीआर टेस्ट मशिन्स मोठय़ा संख्येने उपलब्ध आहेत. त्या मशिन्स तात्पुरत्या स्वरुपात रुग्णालयांना दिल्या गेल्या तर दर दिवशी अतिरिक्त 60 हजार चाचण्या करता येतील असे जैन यांनी म्हटले आहे. 31 ऑगस्टपर्यंत या मशिन्स रुग्णालयांना देण्यात याव्यात असेही निर्देश यूजीसीने दिले आहेत.आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, 23 ऑगस्टपर्यंत देशात 3 कोटी 59 लाख 2 हजार 137 नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या.