त्र्यंबकेश्वरात शांतता पण तणाव; हिंदुत्ववादी संघटनांकडून मंदिराचे शुद्धीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संदल मिरवणुकीवेळी मुस्लिम धर्मीयांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत ब्राह्मण महासंघ व भाजपाने बुधवारी मंदिर प्रवेशद्वारावर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केले, घोषणाबाजी केली. यामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये दिवसभर तणाव होता. पराचा कावळा करून वातावरण बिघडविले जात असल्याचा संताप सामान्यांकडून व्यक्त केला जात आहे.

त्र्यंबकेश्वरमध्ये शनिवारी, 13 मे रोजी रात्री संदल मिरवणूक निघाली. ही मिरवणूक त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ आल्यानंतर परंपरेनुसार काही मुस्लिम बांधव फुले घेऊन प्रवेशद्वाराजवळ गेले. तेथूनच देवाला धूप दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सुरक्षारक्षकांनी अडविल्यानंतर ते तेथून माघारी फिरले. यानंतर हा वाद तेथेच मिटला. मात्र, काहींनी गैरसमज पसरविला. मुस्लिम बांधव जबरदस्तीने मंदिरात घुसण्याचा प्रयत्न करीत होते, अशी अफवा पसरवून तणाव निर्माण केला. मंदिर प्रशासनावर दबाव आणून पोलिसांना पत्र देण्यास भाग पाडले. यानुसार काल मंगळवारी चार मुस्लिम तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी एसआयटी चौकशीची घोषणा केली.

यापुढे धूप दाखवायला जाणार नाही!

आमच्या आजोबांपासून ही परंपरा सुरू आहे. ती आम्ही जपतोय. मात्र असे काही होईल, असे वाटले नव्हते. जो प्रकार घडला त्यामुळे आता थांबावे असे वाटते. पुढच्या वर्षांपासून त्र्यंबक राजाला धूप दाखवायला आम्ही जाणार नाही, उरुस प्रथा बंद करू, असे उरुसचे आयोजक सलीम सय्यद यांनी सांगितले.

 आज भाजपा आध्यात्मिक आघाडी, ब्राह्मण महासंघ, हिंदू महासभा यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडून प्रवेशद्वाराचे शुद्धीकरण केले. घोषणाबाजी करीत फुले उधळली.

पराचा कावळा करून हिंदुत्वाच्या नावाखाली सामाजिक तेढ निर्माण केली जात असल्याचा संताप सामान्यांमधून व्यक्त होत आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये आज तणावपूर्ण शांतता होती.