फडणवीसांचा आणखी एक पेन ड्राइव्ह; महाजनांना मोक्का लावण्यासाठी सरकारी वकिलांचे षडयंत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Devendra fadanvis chief minister maharashtra

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर आरोप करण्यासाठी पुन्हा एकदा ‘पेन ड्राइव्ह’मधील पुराव्यांचा दाखला दिला आहे. विधानसभेत अध्यक्षांकडे व्हिडिओ क्लिपचा पेन ड्राइव्ह देत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा आमदार गिरीश महाजनांवर मोक्का लावण्यासाठी सरकारी वकील, एसीपी यांच्यामार्फत षड्यंत्र रचल्याचा आरोप केला आहे.  या आरोपावर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील उद्या बुधवारी उत्तर देणार आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 293 प्रस्तावांवरील विरोधकांच्या चर्चेला सुरुवात करताना हे आरोप केले. ते म्हणाले, ‘पेन ड्राइव्ह’ मी अध्यक्षांना सुपूर्द करत आहे. कशा प्रकारचे कटकारस्थान शिजवले गेले ते मी या पेन ड्राइव्हमध्ये दिले आहे. गिरीश महाजनांच्या संदर्भात पुण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2018मध्ये मराठा शिक्षण प्रसारक मंडळाच्या भोईटे गटाच्यावतीने गिरीश महाजनांचे स्वीय सहाय्यक रामेश्वर यांनी पाटील गटाच्या व्यक्तीचे अपहरण केले. त्यानंतर महाजनांचा फोन आला आणि त्यांनी धमकी दिली. अशा प्रकारची बनावट केस तयार करण्यात आली. त्या प्रकरणात गिरीष महाजनांना मोक्का लावण्यात यावा असे सांगून कागदपत्रे तयार करण्यात आली,’ असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

सरकारी वकिलाच्या कार्यालयात कारस्थान !

सरकारी वकिल प्रवीण पंडित चव्हाण यांच्या कार्यालयात विरोधी पक्षाच्या नेत्यांना गोवण्याचे षडयंत्र शिजत होते. गिरीश महाजन यांच्यावर पुण्यात तीन वर्षांपूर्वीच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. त्या गुह्याची संपूर्ण स्क्रिप्ट सरकारी वकिल प्रवीण चव्हाण यांनी लिहिली होती. एफआयआरही त्यांनी लिहिला. साक्षीदारही त्यांनी उभे केले. रक्त लागलेला चाकूही त्यांनी तयार केला. आमच्या पक्षातील एक नेते जे सत्ताधारी पक्षात गेले त्यांनी त्यांना सर्व मदत केली. रेड करायला गेलेल्यांचे त्यांनी हॉटेल बुकिंगही करून दिले. याबाबतचे सर्व रेकॉर्डिंग आपल्याकडे असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. यावेळी झालेल्या संभाषणांत  प्रविण चव्हाण म्हणतात, ‘महाजनांवर रेड मारायला मदत लागली तर खडसे साहेबांची मदत घ्या. सर्व पैसे खडसे साहेब देतील. अन्य चित्रफितीतही साहेबांसह अनेक मंत्र्यांच्या नावांचा उल्लेख चव्हाण यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार माझे ऐकत नाहीत बडे साब सपोर्ट करतात. विद्यमान गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलही फारशी मदत करत नाहीत. माजी गृहमंत्री अनिल देशमुखच बरे होते. त्यांचे तर माझ्याशिवाय पानही हलायचे नाही. त्यांनी बदल्यात किमान 250 कोटी रुपये तरी कमावले असतील. मुंबईत शंभर बिल्डर आहेत त्यांच्या प्रत्येकाकडून दोन तीन कोटी जरी जमविले तरी 200 कोटी सहज होतात, असे संभाषण एका चित्रफितीत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच महाजन यांना अडकविण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांसोबत झालेल्या बैठकीचे ट्रान्सस्क्रिप्ट फडणवीस यांनी वाचून दाखवले.

सीबीआयमार्फत चौकशी करा

एकटे महाजनच नाही तर मी स्वतः,सुधीर मुनगंटीवार,चंद्रशेखर बावनकुळे या भाजपा नेत्यांनाही अडकविण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होते. मला अडकवण्यासाठी मुख्यमंत्री फंडातून दिलेल्या मदतीसंदर्भात सोलापूरमध्ये गुन्हा नोंदवण्याचा कट शिजला होता, असा दावा फडणवीस यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्यात यावी. ही मागणी मान्य न झाल्यास आम्ही न्यायालयात जाऊ. विरोधी पक्षाला जर अशा प्रकारे संपविण्याचा प्रयत्न सुरू असेल तर आरपारची लढाई लढण्याचीही आमची तयारी आहे, असे फडणवीस म्हणाले.

नटसम्राट फडणवीसांचे आरोप चुकीचे! –नाना पटोले

फडणवीस यांच्यानंतर चर्चेत सहभागी झालेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांवर पलटवार केला. फडणवीस नटसम्राट आहेत. त्यांना अभिनय चांगला जमतो, पण हे आरोप करण्यापूर्वी त्यांनी 2017 साली आपला फोन कोणाच्या आदेशानुसार टॅप केला जात होता याचे उत्तर द्यावे. ईकबाल मिर्ची या गुन्हेगारकडून देणगी घेणाऱया भाजपावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. नवाब मलिक यांचा राजीनामा मागण्यापूर्वी मुंबई बँक घोटाळा प्रकरणात अडकलेल्या आपल्या नेत्यांचाही राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी केली.