
सामना प्रतिनिधी । पेण
75 वर्षांची परंपरा असलेली तसेच मुंबईसह रायगड जिल्ह्यात 23 शाखा व सुमारे दोन लाख खातेदार असलेल्या पेण अर्बन बँकेत सुमारे 8 वर्षापुर्वी सुमारे 700 कोटींचा घोटाळा झाला होता. या घोटाळा प्रकरणी बँकचे माजी अध्यक्ष शिशिर धारकर ( 57 ) व तत्कालीन तज्ञ संचालक प्रेमकुमार शर्मा ( 63 ) यांना सक्तवसुली संचलनालया कडुन बॅकेच्या रक्कमेची मनी लॅन्डरींग केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.
2001 – 2010 या दशकात शिशिर धारकर व प्रेमकुमार शर्मा यांनी पेण अर्बन बँकेचे पैसे 685 बनावट कर्ज खाती उघडून या बनावट खात्याच्या नावावर सुमारे 774 कोटी रुपये कर्ज दिल्याचे दाखविण्यात आले. नंतर सदरची कर्ज खाती बुडीत ( NPA ) दाखवून बंद करण्यात आले. या नंतर त्यातील रक्कम रोख व धनादेशाच्या माध्यमातून काढण्यात आली. काही रक्कम चल मालमत्ता खरेदीसाठी काढण्यात आली तर काही रक्कमेतुन त्रयस्थ व्यक्तीच्या नावावर 100 एकर जमीन खरेदी करण्यात आली असल्याचा आरोप ईडीने केला आहे.
शिशिर धारकर व प्रेमकुमार शर्मा यांना यापूर्वीही अटक करण्यात आली होती. या घोटाळ्याचा 8 वर्षे पूर्ण झाली असतानाही बॅकेचे ठेवीदार आपल्या कष्टाच्या पैशाच्या प्रतिशेत आजही आशावादी आहेत. या घोटाळ्या विरोधात पेण अर्बन बँके ठेवीदार व खातेदार संघर्ष समितीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या संघर्ष समितीने कोर्टात जाऊन दाद मागितल्याने 25 हजार रुपये पर्यंतच्या ठेवीदारांचे पैसे परत मिळाले आहेत.
या अटक सत्रावर संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेन्द्र जाधव यांनी समाधान व्यक्त करून हायपावर कमेटी व दोषी संचालकांवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी केली. तसेच जप्त केलेली मालमत्तेची त्वरित विक्री करावी व दोषी संचालकांच्या मालमत्तेची विक्री करून सदर रक्कम ठेवीदारांना देण्यात यावी. मागील 8 वर्षांत बॅकेचे सुमारे 350 ठेवीदार मयत झाले असून ईतर ठेवीदारांच्या मरणाची वाट नाही पहाता त्यांना लवकरात लवकर न्याय देण्याची मागणी जाधव यांनी केली आहे.



























































