मुंबईमधील पेंग्विन गुजरात, लखनौ, ओडिशा, गोरखपूरची शान बनणार, प्राणी संग्रहालयांकडून पालिकेकडे मागणी

penguins-7

>> देवेंद्र भगत 

पालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयातील सर्वांचे लाडके पेंग्विन आता गुजरातसह ओडिशा, गोरखपूर आणि लखनौ प्राणीसंग्रहालय-उद्यानांची शोभा वाढवणार आहेत. 2017मध्ये या ठिकाणी आठ पेंग्विन आणल्यानंतर आता पेंग्विनच्या कुटुंबाची सदस्य संख्या 15वर पोहोचली आहे. यातील काही पेंग्विन मागणी केलेल्या संबंधित प्राणी संग्रहालयांना दिले जाणार आहेत. शिवाय त्यांना पेंग्विनच्या देखभालीचे प्रशिक्षणही दिले जाणार असल्याची माहिती संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.

पालिकेचे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयात 2017मध्ये पेंग्विन आणल्यापासून पर्यटकांची संख्या वाढली आहे. दररोज 15 ते 20 हजारांपर्यंत मिळणारे उत्पन्न आता एक लाखापासून सहा लाखांपर्यंत गेले आहे. राणीबागेत दररोज पाच ते सहा हजार तर शनिवार-रविवार, सुट्टीच्या दिवशी येणाऱया पर्यटकांची संख्या आता 28-30 हजारांवर जाते.पेंग्विन पाहण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही.

असे आहे उद्यान व प्राणी संग्रहालयाचे आकर्षण

या उद्यान व प्राणी संग्रहालयात वाघ, बिबटय़ा, हत्ती, हरणे, तरस, माकड, अस्वल, सरपटणारे प्राणी आणि शेकडो पशु-पक्षी व दुर्मिळ औषधी झाडे पाहता येतात. या ठिकाणी अजगर आदी प्रकारचे 13 जातीचे 84 सस्तन प्राणी, 19 जातींचे 157 पक्षी आहेत. याशिवाय 256 प्रजातींचे आणि 6611 वृक्ष-वनस्पती आहेत. तर रंगीत करकोचा, बगळे, सारस असे पाणथळ पक्षी आहेत.