
सामना ऑनलाईन, मुंबई
आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा देताना एका महिन्यापेक्षा अधिक काळ कारावास भोगलेल्यांना दहा हजार व एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्यांना दरमहा पाच हजार रुपये मानधन देण्याबाबतचा शासन निर्णय आज जारी झाला आहे. राज्यातल्या बारा जिह्यातील 619 जणांसाठी 5 कोटी 87 लाख 40 हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत. आणीबाणीत कारावास भोगलेल्यांना निवृत्ती वेतन देण्याच्या निर्णयावर काँग्रेसने कडाडून टीका केली होती.
आणीबाणीच्या काळात एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तींना दरमहा दहा हजार रुपये व त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीला पाच हजार रुपये तर एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तींना दरमहा पाच हजार रुपये व त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीला अडीच हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.

































































