पेन्शनधारकांचा भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर मोर्चा

581

नगर जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या विविध प्रश्‍न सोडविण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ, राज्य परिवहन कर्मचारी संघटना व महाराष्ट्र ईपीएस 95 पेन्शनर वेलफेअर असोसिएशनच्या वतीने सावेडी, आकाशवाणी केंद्राजवळील भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यातील पेन्शनधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

झोपडी कॅन्टीन येथून मोर्चाला सुरुवात झाली. यामध्ये कॉ. आनंदराव वायकर, बापूराव नागवडे, बी.जी. काटे, आप्पासाहेब शेळके, कॉ.अनंत लोखंडे, आत्माराम मोडळे आदींसह सेवानिवृत्त कर्मचारी सहभागी झाले होते. विविध मागण्यांचे फलक पेन्शनधारकांनी गळ्यात लटकवून, तर हातात लाल झेंडे घेऊन मागण्या पूर्ण करण्यासाठी निदर्शने केली. मोर्चा आकाशवाणी केंद्राजवळील भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर आला असता त्याचे सभेत रुपांतर झाले. या मोर्चास आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते व विविध पेन्शनर्स संघटनांचे प्रतिनिधी यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.

जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची पेन्शनबाबतची प्रकरणे गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असून, ती तातडीने सोडविण्याच्या मागणीसाठी भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर सोमवारी बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले होते. याची दखल घेत भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने संध्याकाळी जिल्ह्यातील 90 टक्के पेन्शनधारकांची प्रकरणे निकाली काढली. तर उर्वरीत 10 टक्के प्रकरणे पुढील महिन्यात मार्गी लावण्याचे लेखी आश्‍वासन दिल्याने संध्याकाळी उपोषण मागे घेण्यात आले होते. अनेक वर्षापासून पेन्शन नसलेल्या पेन्शनधारकांचा प्रश्‍न संघटनांच्या आंदोलनाने निकाली निघाला आहे. मंगळवारी पेन्शनधारकांचा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी प्रमुख वक्त्यांची भाषणे झाली. सेवानिवृत्तांना भगतसिंह कोश्यारी समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करावी, दरमहा 9 हजार पेन्शन, महागाई भत्त्यासह अदा करण्यात यावी, नगर येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयात पेन्शनरांसाठी अकाउंट ऑफिस सुरु करण्यात यावे, पेन्शन सेक्शन सुरु करण्यात यावे, कम्युटेशन कपात थांबविणे, ज्यादा कपात केलेली रक्कम व्याजासह परत करणे, सीबीटी मिटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे 15 वर्षे झाल्यानंतर पेन्शनमधून कम्युटेशनची रक्कम कपात करू नये, 15 वर्षांपेक्षा जास्त कपात केलेली रक्कम व्याजासह पेन्शनधारकांच्या खात्यात जमा करण्यात यावी, सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या आरओसीच्या रकमा अदा करण्यात यावे, ज्या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना वेटेज व त्यांचा फरक मिळालेला नाही त्यांना तातडीने फरक मिळावा तसेच इतर अनुषंगिक प्रश्‍नांची सोडवणूक करण्याची मागणी आंदोलकांनी केली. या मागणीचे निवेदन भविष्य निर्वाह निधी आयुक्त अभिषेक मिश्रा यांना देण्यात आले. मिश्रा यांनी मोर्चाच्या शिष्टमंडळास दर सोमवारी सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या तक्रार निवारणासाठी दिवसभर अधिकारी उपलब्ध राहणार असल्याचे स्पष्ट करुन पेन्शनधारकांचे प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. पेन्शनधारकांचे प्रश्‍न न सुटल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या