
नाइटक्लबच्या बेफिकीरपणामुळेच मुंबईत नाईट कर्फ्यू लागला असून ख्रिसमस-नववर्ष स्वागताच्या पाटर्य़ांच्या वेळेचे नियोजन बदलावे लागणार आहे. यातच पोलिसांनीही गर्दी दिसल्यास कठोर कारवाई करण्याचे जाहीर केल्याने मुंबईत संध्याकाळीच पाटर्य़ांमध्ये गिअर पडणार असून चिअर्स… चिअर्सचा जल्लोष होणार आहे.
नववर्ष स्वागतासाठी पाटर्य़ा सायंकाळीच आटोपण्याचे नियोजन अनेकांनी केले आहे. नाईट कर्फ्यू रात्री 11 वाजल्यापासून सुरू होणार असला तरी गर्दी करण्यास मात्र मनाईच राहणार आहे. त्यामुळे सायंकाळपासून सुरू होणाऱया पाटर्य़ांमध्येही मर्यादित उपस्थिती, सुरक्षित अंतर आणि कोरोनाबाबत आवश्यक सर्व प्रकारची खबरदारी घ्यावी लागणार आहे. कोरोनाबाबतचे नियम पाळले जात आहेत की नाही यावर नजर ठेवण्यासाठी सर्व 24 वॉर्डमध्ये पालिका आणि पोलिसांचा वॉच असणार आहे.
आऊटडोअर प्लॅनिंग
मुंबई, पुणे, ठाण्यापासून जवळ असणारे अनेक आऊटडोअर ठिकाण आहेत. लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, पाचगणी येथे जाण्याचे प्लॅनिंग सुरू असल्याचे वृत्त आहे. थंडीही मस्त आहे आणि 25ला नाताळ, 26ला दुसरा शनिवार आणि 27 डिसेंबरला रविवार अशा सलग तीन दिवस सुट्टय़ा आहेत.
काहीजण थर्टी फर्स्ट नाईटचे आऊटडोअर प्लॅनिंग करीत आहेत. अलिबाग, सिंधुदुर्गातील समुद्रकिनारी एन्जॉय करण्याच्या योजना आखल्या जात आहेत. मात्र, महापालिका क्षेत्राबाहेरील ठिकाणांवरही अॅलर्ट जारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरीच नाताळ आणि थर्टी फर्स्ट साजरा करण्यावरही अनेकांची पसंती आहे.



























































