वाढवण बंदरास अवघ्या पालघर जिह्याचा विरोध असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिपूजनाच्या सभेत गर्दी होणार नाही या भीतीने जेएनपीएने चक्क पालघरबाहेरची भाडोत्री गर्दी जमवली. एसटीच्या 120 बसेस आणि 80 खासगी बसेसमधून उरण येथून दहा हजारांहून अधिक नागरिक मोदींच्या सभेसाठी पालघरला आणण्यात आले. यात जेएनपीएचे अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार, त्यांचे कामगार आणि उरणच्या परिसरातील काही शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचाही समावेश होता.
वाढवण बंदराच्या भूमिपूजनासाठी नरेंद्र मोदी यांनी येऊ नये यासाठी वाढवण, डहाणू, पालघरमधील भूमिपुत्रांनी गेले दोन दिवस ‘गो बॅक मोदी’ हा ट्रेण्ड सोशल मीडियावर सुरू केला होता. त्यामुळे मोदींच्या सभेला स्थानिक नागरिकांची गर्दी होणार नाही याची जाणीव झालेल्या सरकारने गर्दी जमवण्याची जबाबदारी जेएनपीए बंदर प्रशासनावर सोपवली होती.
जेएनपीएने एकूण 200 बसेसची व्यवस्था केली होती. त्यातील 45 एसटी बसेस रायगडातून, आठ एसटी बसेस मुंबई सर्कलमधून, 12 बसेस परळ विभागातून, 22 बसेस पनवेल विभागातून आणि 12 बसेस या कुर्ला विभागातून बुक केल्या होत्या अशी माहिती उरण एसटी डेपोचे व्यवस्थापक सतीश मालचे यांनी दिली, तर 80 खासगी बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. या बसेसमधून दहा हजारांहून अधिक लोकांची भाडोत्री गर्दी मोदींच्या सभेसाठी पालघरला पोहोचली.