मुंबईत पाणी साचण्यावर कायमस्वरूपी तोडगा निघतोय; महापालिकेने केले सादरीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दरवर्षी हिंदमाता आणि गांधी मार्पेट या सखल भागांमध्ये पाणी साचून होणाऱया त्रासावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येत असून या दोन्ही ठिकाणी पाणी साठवणाऱया भूमिगत स्वरूपाच्या मोठय़ा टाक्या बांधण्यात येत आहेत. सखल भागात पावसाचे पाणी भरू लागले तर ते या टाक्यांमध्ये सोडण्यात येईल. भरती ओसरल्यानंतर हे पाणी समुद्रात सोडण्यात येईल. यामुळे पाणी साचणार नाही, अशी माहिती मुंबई महापालिकेने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली. हिंदमाता परिसरातील साचणारे पाणी हे प्रमोद महाजन उद्यानातील भूमिगत टाक्यांमध्ये कसे साठविण्यात येईल, याविषयीची चित्रफितही दाखविण्यात आली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल तसेच अन्य अधिकाऱयांकडून कोस्टल रोडचे सुरू असलेले काम तसेच मुंबईतील पाणी साचणाऱया ठिकाणी पाण्याचा वेगाने निचरा कसा करण्यात येईल याविषयीचा आढावा घेतला.

गाळ काढण्याच्या कामाचे संगणकीय संनियंत्रण

मुंबईत 386 पुराचे पाणी साचण्याची ठिकाणे असून 171 ठिकाणांवर पाणी साचणार नाही किंवा लगेच निचरा होईल यासाठी उपाययोजना केली असून जूनअखेर इतर ठिकाणांची कामेही पूर्ण होतील. 24 प्रभागांत 6 मीटर पेक्षा कमी रुंद नाल्यांची 100 टक्के साफसफाई झाली आहे. नाल्यातून गाळ काढणे व त्याची मुंबईबाहेर विल्हेवाट लावणे या संपूर्ण प्रक्रियेवर संगणकीय पद्धतीने नियंत्रण ठेवले जाते व प्रत्येक वाहनाच्या फेऱया,  वाहून नेलेला गाळ, वजन  याची छायाचित्रांसह व्यवस्थित नोंद ठेवली जाते याविषयी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी माहिती दिली.