
सामना प्रतिनिधी । चंद्रपुर
जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव उपवन क्षेत्रात वन्यप्राण्याचा मोठया प्रमाणात वावर असून शिकाऱ्यांनी डोकं वर काढले आहे. जंगली डुकराच्याच्या शिकारी प्रकरणी सुंदरसिंग जूनी (45) याला वनविभागाच्या धाडीत अटक करण्यात आली. जंगलात गावठी बॉम्ब वापरून डुकराची शिकार केल्याचे तपासात उघड झाले आहे.
नवरगाव उपवनक्षेत्रात वाघ, बिबट्या, सांबर, हरिण, चित्ते अस्वल व अन्य प्राण्यासह जंगली डुकरांचा वावर मोठया प्रमाणात आहे. शिकारदार वन्यप्राण्याची शिकार मासांची विल्हेवाट लावतात तसेच त्याची विक्रीही केली जात असल्याची ओरड नेहमी केली जाते. वनविभागाला वन्यप्राण्याच्या शिकारीचा संशय आल्याने संशयिताच्या घरी धाड मारली असता जंगली डुक्कर मारलेल्या अवस्थेत वनविभागाच्या हाती लागला. सबंधित शिकार करणाऱ्या सुंदरसिंग जूनी याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता गावठी बॉम्ब च्या सहाय्याने शिकार केल्याचे समोर आले. वनविभागाच्या कायदयान्वचे कारवाई करत आरोपीला अटक करण्यात आले आहे.



























































