पाच टक्के लाभांशसाठी दहा लाख गमावले; व्यावसायिकाला लावला चुना

दोन हजार रुपयांच्या नोटांच्या मोबदल्यात पाचशे रुपयांच्या नोटा द्यायच्या. या व्यवहारातून पाच टक्के लाभांश मिळेल असे आमिष दाखवत पाच भामटय़ांनी एका व्यावसायिकाला दहा लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पाच जणांविरोधात माटुंगा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खुदाराम झंडबाफ (60) असे त्या फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. खुदाराम यांच्या ओळखीचा व्यक्ती धनराज याने एक प्रस्ताव दिला. पाचशे रुपयांच्या नोटा देऊन दोन हजार रुपयांच्या नोटा घ्यायच्या, मोबदल्यात पाच टक्के लाभांश मिळेल असा तो प्रस्ताव होता. पाच टक्के लाभांश मिळणार म्हटल्यावर खुदाराम यांना हाव सुटली आणि त्यांनी तसे करण्यास होकार दिला. त्यानंतर धनराजने विजय कोळी नावाच्या व्यक्तीशी खुदाराम यांच्याशी ओळख करून दिली. विजय कोळी यांनी एक पार्टी असून त्यांच्याकडे दोन हजार रुपयांची एकूण 15 लाख इतकी रोकड आहे. जर तुम्ही संबंधिताला पाचशे रुपयांच्या नोटा दिल्यास पाच टक्के लाभांश मिळेल असे सांगून विलेपार्ले येथे बोलावले. पण तेव्हा समोरची व्यक्ती न आल्याने ती डील रद्द झाली. त्यानंतर दुसरी पार्टी तयार असून त्यांना दोन हजार रुपयांच्या एकूण दहा लाखांची रोकड द्यायची असून त्याऐवजी तेवढीच रोकड पाचशे रुपयांच्या स्वरूपात हवी आहे. घणसोली येथे ती पार्टी रोकड घेऊन भेटेल असे विजय याने खुदाराम यांना सांगितले. त्यावेळी प्रकाश डोळस नावाची व्यक्ती खुदाराम यांना त्यांच्याच कारमधून कोपरखैरणे येथे घेऊन गेली.

पैशांनी भरलेली बॅग देताच दगा झाला

कोपरखैरणे येथील कोकिलाबेन इस्पितळाच्या एका गेटजवळ खुदाराम पैशांची बॅग घेऊन उभे होते. त्यावेळी तेथे एक व्यक्ती बॅग घेऊन आला. त्या व्यक्तीने खुदाराम यांच्याकडून पैशांची बॅग घेतली. तेवढय़ात एक गाडी तेथे आली आणि त्यातून दोन व्यक्ती हातात बांबू घेऊन खाली उतरल्या. दोघांच्या तोंडावर पोलीस लिहिलेले मास्क होते. त्यानंतर त्या दोघांनी ज्याच्याकडे पैशांची बॅग होती त्याला काहीही न बोलता मारण्याचे नाटक करत गाडीत बसवून निघून गेले. आपले दहा लाख रुपये घेऊन तिघे पळून गेल्याचे लक्षात येताच खुदाराम यांनी पोलिसांत पाच जणांविरोधात तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलीस अधिक तपास करीत आहेत.