
कोरोना काळात लोकांना दिलासा मिळण्याऐवजी त्यांचा त्रास वाढतच चालल्याचे दिसून येत आहे. गेल्या दीड वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर नजर टाकल्यास ही बाब प्रकर्षाने जाणवते. यवतमाळबाबत विचार करता इथे गेल्या 15 महिन्यांत म्हणजेच साधारणपणे कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाल्यापासून पेट्रोल आणि डिझेल दोन्हीचे दर बेफाम वाढले आहेत. या दोन्ही इंधनांच्या दरात जेव्हा केव्हा घट झाली ती अवघ्या काही पैशांची होती. मात्र जेव्हा वाढ झाली तेव्हा बहुतांशवेळा ती रुपयांमध्ये होती. 1 सप्टेंबर रोजी यवतमाळमध्ये पेट्रोलचा दर हा 108.70 रुपये प्रति लिटर इतका आहे तर डिझेलचा दर हा 96.16 रुपये प्रति लिटर इतका आहे.
बुधवारी यवतमाळमध्ये पेट्रोलचे दर हे 13 पैशांनी तर डिझेलचे दर हे 14 पैशांनी कमी झाले आहेत. 1 एप्रिल 2020 ला पेट्रोलचे भाव प्रती लिटर 77.53 रुपये होते. हाच दर 1 सप्टेंबर 2020 रोजी 108.70 रुपये प्रति लिटर इतका झाला. डिझेलचे भाव हा 1 एप्रिल 2020 66.42 रुपये इतका होता जो 1 सप्टेंबर 2021 रोजी 96.16 रुपये प्रति लिटर झाला आहे. ‘इंधनाचे दर कमी झाले तर त्याचा दिलासा सर्वसामान्य ग्राहकांना मिळत नाही, कारण ही दर कपात अवघ्या काही पैशांची असते’ अशी प्रतिक्रिया पांढरकवड्याला राहणाऱ्या विजय देशपांडे यांनी दिली आहे. दोन जिल्ह्यांत इंधनाचे दर वेगवेगळे असल्याने जिल्ह्यांच्या सीमेवर राहणाऱ्या नागरिकांना स्वस्त इंधन जिथे असेल तिथे जाऊन ते भरणे परवडते, मात्र इतरांना महाग इंधन घेण्याशिवाय पर्याय नसतो, यामुळे इंधनाचे दर सर्वत्र समान राहतील यासाठी काहीतरी उपाययोजना करावी अशी मागणीही विजय देशपांडे यांच्यासारख्या ग्राहकांनी केली आहे.






























































