
पेटपुराण या वेबसिरीजनंतर सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर ही जोडी पुन्हा एकत्र येत आहे. आगामी मीडियम स्पाइसी या चित्रपटात ते झळकणार आहेत. विधी कासलीवाल निर्मित आणि मोहित टाकळकर दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शेफ निस्सीम म्हणजेच ललित प्रभाकर हॉटेलमध्ये काम करतोय आणि त्याचा सहकारी शेफ शुभंकर म्हणजे सागर देशमुखच्या ‘ए शेफ, यार काम काम होता है, लाईफ नहीं’ असा संवाद ट्रेलरच्या सुरुवातीला ऐकायला मिळतोय. एका शेफच्या आयुष्यावर हा चित्रपट बेतलेला आहे. साऊथ इंडियन टोनमध्ये बोलणारी शेफ गौरी या दाक्षिणात्य मुलीची भूमिका सई ताम्हणकरने तर आपल्या ठाम मतांसह स्वतःच्या पायावर उभी असलेली प्राजक्ता ही भूमिका पर्ण पेठे हिने साकारली आहे. नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, इप्शिता या तरुण कलाकारांना ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी, अरुंधती नाग आणि अभिनेते रवींद्र मंकणी यांची भक्कम साथ लाभली आहे. हा चित्रपट 17 जूनला प्रदर्शित होईल.


























































