बंडखोरांच्या एन्काऊंटरवरून मेघालय पेटले, मुख्यमंत्री कोनार्ड संगमा यांच्या निवासावर पेट्रोलबॉम्ब फेकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पोलीस चकमकीत एका बंडखोराच्या एन्काउंटरवरून मेघालय पेटले आहे. दंगलखोरांनी मुख्यमंत्री कोनार्ड संगमा यांच्या निवासस्थानावर पेट्रोलबॉम्ब फेकले. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. हिंसाचारामुळे राजधानी शिलाँगमध्ये संचारबंदी लावण्यात आली असून राज्याच्या इतर भागांतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. दरम्यान, बंडखोराच्या एन्काउंटरविरोधात गृह मंत्री लहकमन रिम्बुई यांनी राजीनामा दिला आहे.

13 ऑगस्ट रोजी चेस्टरफिल्ड थांगखियू नावाच्या एका बंडखोराने आत्मसमर्पण केले. मात्र पोलिसांनी त्याचे एन्काउंटर केले. 2018मध्ये झालेल्या धमाक्याचे षड्यंत्र थांगखियू यानेच रचले होते, असा दावा पोलिसांनी केला. रविवारी थांगखियू याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारानंतर शिलाँग शहरात दगडफेक सुरू झाली. बघता बघता हिंसाचाराचे लोण संपूर्ण शहरात पसरले. दंगलखोरांनी मुख्यमंत्री कोनार्ड संगमा यांच्या निवासस्थानावरही पेट्रोलबॉम्ब फेकले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून शहरात 48 तासांसाठी संचारबंदी लावण्यात आली. त्याबरोबरच पूर्व, पश्चिम व दक्षिण खासी तसेच रिभोई भागात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली.

पोलिसांनी बंडखोर थांगखियूच्या केलेल्या एन्काउंटरच्या विरोधात गृह मंत्री लहकमन रिम्बुई यांनी राजीनामा दिला. पोलिसांनी थांगखियूच्या घरी छापा मारला आणि त्याचे एन्काउंटर केले, असा आरोप त्यांनी राजीनाम्यात केला आहे. पोलिसांनी आपल्या मर्यादा ओलांडल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या घटनेची स्वतंत्र तसेच न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.