कोपरगावात पेट्रोलपंपावरील वादातून मॅनेजरचा खून; दोघांना अटक; एक फरार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारातील गुरुराज पंपावर तिघा मद्यपींनी पंपावरील कर्मचाऱयाला धक्काबुक्की केली. याची विचारणा करण्यास गेलेल्या मॅनेजरचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना गुरुवारी (दि. 29) सायंकाळी घडली. कोपरगाव पोलिसांनी तीन आरोपींपैकी दोघांना काही तासांत अटक केली असून, एक आरोपी फरार आहे.

 भोजराज बापूराव घनघाव (वय 40, रा. दहेगाव बोलका, ता. कोपरगाव) असे खून झालेल्या मॅनेजरचे नाव आहे. अमोल धोंडीराम मोहिते यांनी फिर्याद दिली आहे.

जुन्या मुंबई-नागपूर महामार्गावर संवत्सर शिवारात गुरुराज पेट्रोलपंप आहे. या पंपावर भोजराज घनघाव हे मॅनेजर आहेत. सायंकाळी सात-साडेसात वाजेच्या सुमारास फिर्यादी अमोल मोहिते पंपावर कामाला होते. त्यावेळी तिथे तिघेजण एका दुचाकीवरून तेथे आले. पेट्रोल भरण्यावरून तेथील कर्मचाऱयांची व त्या तिघांची वादावादी झाली. त्यावेळी तेथे कामावर असलेले मॅनेजर भोजराज या वादावादीत मध्यस्ती करीत होते.

त्यातील दोघांनी भोजराज यांच्यासोबत वादावादी करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्याने त्यातील एकाने कमरेचा चाकू काढून भोजराज यांच्यावर वार करण्यास सुरुवात केली. यामध्ये ते गंभीर जखमी होऊन पडल्याचे पाहून ते तिघे दुचाकीवरून पळून गेले. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या भोजराज घनघाव यांना कर्मचाऱयांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती कोपरगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाली. पोलीस विभागीय अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे व उपनिरीक्षक भरत दाते यांनी भेट देत तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत काही तासांत एका आरोपीला नाशिक येथून तर दुसऱया आरोपीला शिर्डी येथून ताब्यात घेत अटक केली, तर यातील तिसरा आरोपी हा फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दोघा आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, पोलीस उपनिरीक्षक  रोहिदास ठोंबरे, उपनिरीक्षक भरत दाते, जातीधर तमनर, संभाजी शिंदे, गणेश मैड, राम खारतोडे, गणेश काकडे, बाळू योंगडे, ज्ञानेश्वर भांगरे, खंडेराव रहाणे, गणेश नकारे, अजय जाधव, अविनाश गायकवाड, सुभान शेख यांनी केलेली आहे.