तुंगारेश्वरमधील अनधिकृत शाळा-कॉलेज जमीनदोस्त करा, उच्च न्यायालयात आज सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वसई-विरार महापालिका हद्दीत बेकायदा बांधकामांना पेव फुटले असून भूमाफियांनी वनजमिनी बळकावत त्यावर अनधिकृत बांधकामे केली आहेत. तुंगारेश्वरच्या वनजमिनीवर अनधिकृत शाळा आणि कॉलेज उभारण्यात आले असून हे बेकायदा बांधकाम जमीनदोस्त करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मे 2019 मध्ये दिले आहेत. मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली असून शाळेवर कारवाईच्या मागणीसाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर उद्या सोमवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात येणार आहे.

वसईतील कोहली येथे ज्ञानोदय मल्टिपर्पज विद्यालय आणि पेल्हार येथील तुंगारेश्वर अॅकॅडमी ट्रस्ट या बेकायदा शाळा व कॉलेजमध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असून या अनधिकृत बांधकामाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने ही दोन्ही बेकायदा बांधकामे 5 मे 2019 पूर्वी जमीनदोस्त करण्याचे आदेश ट्रस्टींना दिले होते. मात्र तीन वर्षे उलटूनही शाळेवर कारवाई करण्यात न आल्याने मुंबई उच्च न्यायालयात सामाजिक कार्यकर्ते राजीव गुप्ता यांनी अॅड. अजय जैस्वाल यांच्यामार्फत याचिका दाखल केली. न्यायालयाने सदर शाळा जमीनदोस्त करण्याचे आदेश द्यावेत तसेच ट्रस्टी व कागदपत्रात फेरफार करणाऱया अधिकाऱयांवर कारवाई करावी अशी मागणी याचिकेतून केली आहे. या याचिकेवर सोमवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात येणार आहे.