इस्रायलमध्ये फायझरच्या लसीचा प्रभाव 95 टक्क्यांवरून घसरून 64 टक्के झाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pfizer

कोरोनाविरोधातील फायझरची लस ही जगभरातील सर्वात प्रभावी 3 लसींपैकी एक आहे. या लसीचा प्रभाव हा 95 टक्के इतका असल्याचं सांगितलं जात होतं. म्हणजेच ही लस घेतलेल्या लोकांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता ही 95 टक्क्यांनी कमी होते. लस घेतल्यानंतरही कोरोना झाला तरी त्याचा लस घेतलेल्या व्यक्तीला गंभीर त्रास होत नाही. इस्रायलने मात्र या लसीचा प्रभाव 95 टक्क्यांवरून घसरून आता फक्त 64 टक्के इतका राहिला असल्याचं म्हटलं आहे. कोरोनाचे संक्रमण आणि लक्षणे असलेला कोरोनाचा आजार दूर ठेवण्यासाठी फायझरची लस ही 64 टक्क्यांपर्यंतच प्रभावी ठरत असल्याचं इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. असं असलं तरी कोरोनामुळे बाधित होऊन गंभीररित्या आजारी होण्यापासून ही लस 93 टक्के सुरक्षा प्रदान करते असंही सांगण्यात आलं आहे.

फायझरने या आकडेवारीबाबत बोलण्यास नकार दिला आहे. आमची लस ही डेल्टासोबतच कोरोनाच्या इतर सगळ्या रुपांपासून संरक्षण देण्यास सक्षम असल्याचं या कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. इस्रायली मंत्रालयाने या लसीचा प्रभाव कमी झाला असल्याबद्दल बोलत असतानाच ही लस कोरोनाची लाट थोपवण्यासाठी किती फायदेशीर ठरली याची मात्र माहिती दिलेली नाहीये. मे महिन्यात रॉयटर्सने एक लेख प्रसिद्ध केला होता. या लेखात इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले होते की फायझर लसीचे 2 डोस हे गंभीररित्या आजारी पाडण्यापासून तसेच रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येण्यापासून लाभार्थ्याला दूर ठेवतात. ही लस 95 टक्के प्रभावी असल्याचं त्यावेळी इस्रायली आरोग्य मंत्रालयाने म्हटलं होतं.

इस्रायलच्या 60 टक्के जनतेला फायझरची लस देण्यात आलेली आहे. एप्रिल महिन्यात इस्रायलने मास्क घालण्याची नागरिकांना गरज नसल्याचे जाहीर केले होते. मात्र तिथे पुन्हा कोरोना वाढायला लागल्याने नव्याने निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. इस्रायलने आपल्या देशात लसीकरण मोहीम वेगाने राबवली होती. नियोजित कालावधीत आपल्या प्रत्येक नागरिकाला इस्रायलने लस दिली. त्या जोरावर इस्रायलने कोरोनावर नियंत्रण मिळवले होते. परिस्थिती इतकी निवळली होती की तिथल्या नागरिकांना मास्कही घालायची गरज उरली नव्हती. , मात्र निर्बंध नाममात्र प्रमाणात उरल्यानंतर कोरोनाने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली आहे. इस्रायलमध्ये गेल्या वर्षी 8 लाख 36 हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील 6 हजार 331 जणांचा मृत्यू झाला होता.