मुंबई आयआयटी आणि जपानच्या तोहोकू विद्यापीठातून पीएच.डी.ची संधी

मुंबईची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) आणि जपानच्या तोहोकू विद्यापीठातून पीएच. डी. करण्याची संधी भारतीय विद्यार्थ्यांना मिळणार आहे. दोन्ही विद्यापीठांत झालेल्या सामंजस्य करारामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून हा शैक्षणिक कार्यक्रम राबविला जाणार आहे. आयआयटी आणि तोहोकू विद्यापीठाने एप्रिलमध्ये झालेल्या करारानुसार मुंबई आयआयटी पुढील वर्षी तोहोकू विद्यापीठात एक केंद्र सुरू करणार आहे.

या तोहोकू विद्यापीठ आयआयटी बॉम्बे जॉइंट इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्स (जेआयई) करारानुसार सध्या विद्यार्थ्यांना पीएच.डी.त संधी दिली जाईल. कालांतराने केंद्राच्या माध्यमातून एकत्रित पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविले जातील, अशी माहिती आयआयटीतील अधिकृत सूत्रांनी दिली. संशोधनाला, विद्यार्थी आणि प्राध्यापकांमधील शैक्षणिक देवाणघेवाणीला चालना देण्याच्या उद्देशाने हा करार करण्यात आला आहे. शाश्वत ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता, विज्ञान अशा विविध विषयांमधील संशोधनाला चालना दिली जाईल.