
महिलांचे मोबाईल नंबर मिळाल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या नंबरवरून कॉल करायचे. मग अत्यंत अश्लील भाषेत बोलून त्यांच्याकडे शरीरसुखाची मागणी करायची. इतकेच नाही तर ठार मारण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करणाऱया एका विकृत वॉचमनला वडाळा टी. टी. पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. हरयाणा येथे त्याला ताब्यात घेण्यात आले.
वेगवेगळ्या नंबरवरून मला कॉल येतो आणि फोन उचलला की एकच व्यक्ती अश्लील भाषेत बोलते. त्याला उलट काही बोलले की तो जीवे मारण्याची धमकी देतो अशी तक्रार नयना (नाव बदललेले) या महिलेने वडाळा टी. टी. पोलिसांत दिली होती. गुह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बिराजदार व पथकाने महिलांना फोन करून छळणाऱया अज्ञात इसमाचा शोध सुरू केला तेव्हा ती व्यक्ती दिल्ली तसेच हरयाणा येथून फोन करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला पण त्या विकृताचा ठावठिकाणा मिळत नव्हता. अखेर कसून शोध घेतल्यानंतर हरयाणा येथील गुरुग्राम येथे आरोपी राहत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार तेथे धडक देऊन अधिक माहिती घेतल्यावर पोलिसांनी गुरगाव येथे एका कॉलनीमध्ये वॉचमनचे काम करणाऱया विजयकुमार गुप्ता (35) याला ताब्यात घेतले. त्याला ताब्यात घेऊन मुंबईत आणल्यावर चौकशीत त्याने गुह्याची कबुली दिली.
असा मिळवायचा नंबर
हरयाणाच्या मंगोलिया हौ. सोसायटीत वॉचमनचे काम करीत असताना तेथे व्हिजिटर्ससाठी मोबाईल ऍप ठेवण्यात आले होते. तेव्हा तेथे येणाऱया महिला त्या ऍपमध्ये त्यांचा मोबाईल नंबर नोंद करायचे. मग विजयकुमार ते नंबर घेऊन त्यांना चोरीचा मोबाईल व चोरीच्या सीम कार्डचा वापर करून कॉल करायचा आणि अश्लील भाषेत बोलायचा. त्याच्याकडून दोन मोबाईल फोन व विविध कंपन्यांचे चोरीचे सीमकार्ड मिळाले.
























































