
धनेश पाटील
ठाण्यातील अनेक क्रिकेटपटू त्यांच्या हाताखाली घडले आहेत. क्रिकेटचे गुरु शशिकांत नाईक. प्रतिकुलतेतही क्रिकेटची साधना स्वबळावर सुरू ठेवून ते आज अनेक विद्यार्थ्यांचे गुरुकुल ठरले आहेत.
कसोटीपटू खंडू रांगणेकरांची कर्मभूमी असलेल्या ठाण्यावर जीवापाड प्रेम करत इथल्या युवा खेळाडूंना घडवण्यात आपल्या आयुष्याची तब्बल पंचेचाळीस वर्षे पणाला लावून सुमारे एकवीस हजारहून अधिक खेळाडूंना आपल्या छत्रछायेखाली घडवणारे आद्य द्रोणाचार्य म्हणजे शशिकांत नाईक. क्रिकेट हेच जीवन मानणाऱया नाईक सरांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. मात्र, या सन्मानांपेक्षा त्यांनी खेळातून जोडलेली माणसं हीच खरी संपत्ती असल्याचं मानणारे नाईक सर हे हे खरे क्रीडाजगतातलं वैभवच.
ठाण्यातल्या माझ्या घराजवळच नाईक यांचं अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं घर. सडपातळ बांधा, उंचापुरा आणि अगदी साधं राहणीमान. एरव्ही येता जाता दिसणाऱया या सामान्य व्यक्तीत इतकं अनन्यसाधारण व्यक्तिमत्त्व दडलेलं असेल हे त्यांना भेटून त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतरच जाणवलं. अनेक तास त्यांच्या राहत्या घरी आम्ही गप्पा मारल्या आणि त्यांना बोलतं केल्यानंतर त्यांचे फोटो टिपण्यासाठी मी कॅमेरा काढला. आपल्या खेळाचा गुरुमंत्र हजारो विद्यार्थ्यांना देऊन सेंट्रल मैदानात ऊन-पावसात आपल्या शिष्यांना घडवण्यात मग्न असलेल्या नाईक सरांचे आधी काही पोर्ट्रेट मी टिपले. नंतर वेगळं पोट्रेट टिपण्यासाठीची माझी धडपड सुरू झाली. नाईक सरांनी कधीही आपल्या शिष्यांमध्ये भेदभाव केला नाही. त्यांच्यासाठी जसे सगळेच चेंडू सारखे तसेच त्यांचे विद्यार्थीही त्यांना सारखेच. याच चेंडूंसोबत त्यांचं एक हसरं पोट्रेट मी टिपलं. एरव्ही मैदानात चेंडू-फळी घेऊन असलेले नाईक सरांचं दुसरं छायाचित्र त्यांच्या या खऱया संपत्तीसोबत मी टिपलं. हे फोटो टिपताना सतत त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा जीवनप्रवास समजून घेण्याचा मी प्रयत्न करत होतो. हजारो शिष्यांना घडवणाऱया या गुरूचा जीवनप्रवासाचा आलेख मात्र अनेक चढ-उतारांचा होता. किंबहुना सुरुवातीचा काळ अत्यंत यातना, कष्ट आणि अपार मेहनतीचा असाच असल्याचं त्यांच्याशी बोलताना जाणवलं.
शशिकांत नाईक हे मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेलं अनन्यसाधारण व्यक्तिमत्त्व. कर्नाटकमधल्या कुमठा तालुक्यातील एका छोटय़ा गावातला त्यांचा जन्म. याच गावात त्यांचं सुरुवातीचं शालेय शिक्षण झालं. 1968 साली वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ते ठाण्यात आले. आईवडिलांनी इथे थाटलेल्या हॉटेलात मदतीसाठी म्हणून त्यांना तेव्हा बोलवण्यात आले होते. गावातून शहरात आलेल्या शशिकांत यांची आपल्या पालकांकडे पाटी, पुस्तक, पेन आणि लोखंडी पेटी इतकीच माफक मागणी होती. या मागणीतून त्यांना पुढे शिक्षण घ्यायचं आहे ही कल्पना त्यांना आपल्या पालकांपर्यंत पोहोचवायची होती. मात्र, हॉटेलातली गरज पाहता त्यांना या शिक्षणाला राम राम ठोकावा लागला. हॉटेलाच्या कामात काही काळातच रमलेल्या नाईक यांना या हॉटेलशेजारीच असलेल्या मैदानी खेळानं गोडी लावली अन् मैदानातल्या ज्येष्ठ खेळाडूंचा सराव बघता बघता ते कधी या मैदानात उतरले ते त्यांना कळलंच नाही. आपल्याच हॉटेलात पडेल ते काम करत असलेले नाईक या कामासोबत मैदानात खेळणाऱया खेळाडूंचं तसंच प्रशिक्षकांचं निरीक्षण करत त्यांचा खेळ आत्मसात करण्यात अनेकदा गुंग होत. या मैदानात आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेटच्या सामन्यांना ते नियमित हजेरीही लावत. स्पर्धेनंतर आयोजकांना गाठून त्यांच्याकडून फुटका चेंडू, तुटकी बॅट मागून घेत असत आणि मग याच चेंडू-फळीने पुढे काही काळ त्यांचा क्रिकेटचा सराव चालत असे. कोणत्याही प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखेरीज एकलव्याप्रमाणे त्यांनी आपली क्रिकेटची साधना सुरू ठेवली अन् खेळाच्या नियमित सरावानं त्यांच्यातला उत्तम खेळाडू घडला.
1971 साली त्यांनी टेनिस क्रिकेटला सुरुवात केली. त्यांचे बंधू सुरेश नाईक आणि सुधाकर नाईक हेदेखील गुणी क्रिकेटपटू होते. त्यांच्या खेळाचादेखील नाईक यांना चांगलाच फायदा झाला. बघता बघता क्रिकेट हा नाईक यांच्या जीवनाचा अविभाज्य घटकच बनला. आपल्या 27 वर्षांच्या टेनिस क्रिकेटच्या कारकीर्दीत त्यांनी दमदार गोलंदाज म्हणून एक वेगळा दबदबाच निर्माण केला. आपल्या वेगवान गोलंदाजीने 700 पेक्षा अधिक बळी मिळवलेल्या नाईक यांच्याकडे अनेक पुरस्कारांची ठेव जमा झाली. यातील सुमारे 60 पुरस्कार हे मानाचे असल्याचं ते सांगतात.
क्रिकेट खेळात उतरलेल्या नाईक यांनी पुढे मार्ंनग क्लबची स्थापना केली. कधीही सिझन बॉलवर क्रिकेट न खेळलेल्या नाईक सरांनी काळाची गरज ओळखून या क्लबच्या माध्यमातून नवोदितांना सिझन बॉलवर सराव देण्यास सुरुवात केली. या क्लबमधून घडलेल्या अनेकांनी पुढे राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळात देदिप्यमान कामगिरी बजावली. याच शिष्यवर्गातून तयार झालेला पहिला खेळाडू आणि आता नावारूपाला आलेलं नाव म्हणजे सुलक्षण कुलकर्णी. याचबरोबर अभिजित काळे, नीलेश कुलकर्णी, प्रवीण तांबे, विद्याधर कामत या आणि अशा तब्बल एकवीस हजार विद्यार्थ्यांना नाईक सरांनी घडविले.
दररोज सकाळी 7 ते 9 आणि दुपारी 3 ते 5 या वेळेत नाईक सर त्यांच्या शिष्यांना क्रिकेटचे धडे देण्यात गुंग असलेले पाहायला मिळतात. अनेक आनंदाचे क्षण नाईक सरांनी आपल्या आठवणीत जपून ठेवले आहेत. मात्र यात काही मनाला चटका लावणाऱया आठवणींचीदेखील ठेवण आहे. आपला मुलगा तापाने आजारी असताना त्याला दवाखान्यात न नेता घरीच औषधोपचार करुन त्यावेळी मुलाऐवजी क्रिकेटला प्राधान्य देत एका शाळेच्या टीमला क्रिकेट स्पर्धेसाठी घेऊन गेलेल्या नाईक सरांना या वेळेची चांगलीच किंमत मोजावी लागली होती. खेळात शाळेने उत्तम कामगिरी बजावल्याचा आनंद एकीकडे असतानाच दुसरीकडे त्यांना आपल्या मुलाने प्राण गमावल्याचं कटू सत्यही पचवावं लागलं होतं.
क्रिकेटमधल्या या योगदानाबद्दल शशिकांत नाईक यांना स्वा. सावरकर पुरस्कार, खंडू रांगणेकर पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, गुणिजन पुरस्कार, ठाणे गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे.






















































