समुद्रात पडलेल्या महिलेचे फोटोग्राफरने वाचवले प्राण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना काळात असलेले निर्बंध आणि मुसळधार पावसात गेट वे ऑफ इंडिया परिसर पाहण्याची हौस एका महिलेच्या जिवावर बेतली. गेट वे ऑफ इंडियाच्या संरक्षण कठडय़ावर बसलेली महिला तोल जाऊन समुद्रात पडली. मात्र, दैव बलवत्तर म्हणून तिथे असलेल्या फोटोग्राफरने प्रसंगावधान राखत खवळलेल्या समुद्रात उडी घेतली आणि तिचे प्राण वाचवले. मुंबईत सोमवार सकाळपासून पावसाचे दमदार आगमन झाले आहे. त्यामुळे काहींनी घरात राहणे पसंत केले, तर काहींनी वर्षा पर्यटनासाठी गेट वे ऑफ इंडिया परिसर गाठले. खवळलेला समुद्र, उसळणाऱ्या लाटा आणि पावसात भिजण्यासाठी या ठिकाणी पर्यटकांनी गर्दी केली होती. यावेळी एक महिला तोल जाऊन समुद्रात पडली. पर्यटकांनी एकच आरडाओरडा केल्यानंतर या महिलेला वाचवण्यासाठी फोटोग्राफर असलेल्या गुलाबचंद गौंड याने समुद्रात उडी मारली. मात्र, मुसळधार पाऊस आणि खवळलेल्या समुद्रामुळे महिलेला सुरक्षित बाहेर काढणे त्याला शक्य होत नव्हते. कठडय़ावर असलेल्या पर्यटकांनी समुद्रात दोरखंड आणि एक टय़ूब टाकली. दोरखंड आणि टय़ूबच्या सहाय्याने गौंड याने या महिलेला सुरक्षित बाहेर काढले. सुमारे अर्धा तास चाललेला थरार संपला.