
>> देवेंद्र भगत
मुंबईत वाढलेले प्रदूषण रोखण्यासाठी मियावाकी वने फायदेशीर ठरणार आहेत. जानेवारी 2020 मध्ये या वनांच्या लागवडीला सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये आतापर्यंत 68 हून जास्त ठिकाणी ही वने बहरली असून पाच लाखांवर झाडे लावण्यात आली आहेत. तर मार्च 2024 पर्यंत आणखी 14 ठिकाणी दोन लाख झाडे लावणार असल्याचे मुंबई महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक तथा कृक्ष अधिकारी जितेंद्र परदेशी यांनी दैनिक ‘सामना’शी बोलताना सांगितले.
मियावाकी वनांचा नेमका फायदा कसा होतो?
– मियावाकी वने कमी जागेत आणि कमी वेळेत वाढणारी असून कोकणातील ‘देवराई’शी आणि सिंगापूरसारख्या शहरांमध्ये असणाऱ्या अर्बन फॉरेस्ट संकल्पनेवर आधारित आहेत. दोन वर्षांत विकसित होणाऱ्या या वनांमधील झाडांमध्ये कमी अंतर असल्याने ती घनदाट असतात. मुंबईसारख्या कमी मोकळय़ा जागा उपलब्ध असल्याने फायदेशीर ठरतात. सुरुवातीची साधारणपणे दोन-तीन वर्षे या वनांची नियमित देखभाल करावी लागते. त्यानंतर ही वने वाढत राहतात आणि आपल्याला अव्याहतपणे प्राणवायू देत राहतात.
पालिका हा उपक्रम कसा राबवत आहे?
– मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत ‘आरजी, पीजी’सारखे आरक्षण असलेले अनेक प्लॉट आहेत. अशा मोकळय़ा ठिकाणांवर पालिकेच्या माध्यमातून ही वनराई तयार करण्यात येत आहे. यासाठी ‘सीएसआर’ फंड आणि विविध सामाजिक संस्थांचे सहकार्यही मिळत आहे. यामध्ये आतापर्यंत पाच लाख 40 हजारहून जास्त झाडे लावण्यात आली आहेत.
यासाठी पुढील नियोजन कसे आहे?
– जागांच्या उपलब्धतेनुसार ही वने वाढवली जाणार आहेत. चालू आर्थिक वर्षात मार्चपर्यंत अजून दोन लाख झाडे लावण्यात येणार आहेत. नुकतीच एम पूर्व विभागातील देवनार व्हिलेज रोड, गोवंडी पूर्व येथील पालिकेच्या श्री दत्ताराम गणपत पाटील मनोरंजन मैदानात एम/एस बिलीव्ह या संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेच्या सामाजिक उत्तरदायित्क निधीमधून सस्टेनेबल फाऊंडेशन या संस्थेमार्फत सुमारे 4000 देशी वृक्षांची लागवड पूर्ण करण्यात आली आहे.
मियावकीमध्ये कोणत्या प्रकारची झाडे लावली जातात?
– मियावकी वनांमध्ये चिंच, पळस, करंज, बेहडा, साकर, रतनगुंज, साग, सीताफळ, बेल, पारिजातक, कडूनिंब, बांबू, पेरू, पुत्रजिका, सीता अशोक, हरडा, खैर, जांभूळ, मोह, बहावा, सुरू, बदाम, रिठा, शिसम, अर्जुन, फणस, आकळा, कदंब, कढीपत्ता, नारळ, बकुळ, आंबा, निलगिरी यासह फुलझाडे-फळझाडे लावण्यात येत आहेत. विशेष म्हणजे मियावकी वनांची संकल्पना जपानी पद्धतीची असली तरी मुंबईत लागवड करण्यात येणारी झाडे ही देशी प्रजातीची आहेत.































































