खेलो इंडिया युथ गेम 2021 चा शुभारंभ आज, महाराष्ट्रापुढे विजेतेपद राखण्याचे आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीच्या संकटामुळे होऊ न शकलेल्या ‘खेलो इंडिया युथ गेम-2021’ चा औपचारिक  शुभारंभ आज शनिवारी पंचकुला, हरयाणा येथे होणार आहे. यंदाच्या या युथ गेममधे गतविजेता महाराष्ट्र आणि यजमान हरयाणा यांच्यात जोरदार संघर्ष झडणार हे निश्चित. यंदाच्या वर्षात युथ गेम 2022 ही खेळवला जाणार आहे. त्यामुळे देशातील सर्व राज्यांच्या खेळाडूंना पदकप्राप्तीची सुवर्णसंधी दोनदा लाभणार आहे.

महाराष्ट्राने या युथ गेमसाठी 396 युवा खेळाडूंचा मोठा संघ पाठवला आहे. हा संघ 26 पैकी 23 क्रीडा प्रकारांत सहभागी होणार आहे.  तिसऱया क्रमांकासाठी कर्नाटक आणि दिल्ली या राज्यांच्या संघात सामना होईल असे संकेत आहेत. ‘खेलो इंडिया युथ गेम-2021’ चा शुभारंभ शनिवारी पंचकुलाच्या ताऊ देवीलाल क्रीडा संकुलात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि केंद्रीय क्रीडा व युवक कल्याणमंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी केंद्रीय गृह, क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक, हरयाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला आणि हरयाणाचे क्रीडामंत्री एस. संदीप सिंग हेही प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्राचा कबड्डीत विजयाने प्रारंभ

‘खेलो इंडिया युथ गेम’मध्ये आपले प्रभुत्व नेहमीच राखणाऱया महाराष्ट्राने प्राथमिक फेरीत आज मुलांच्या कबड्डी गटात आंध्र प्रदेशचा 48-29 असा धुव्वा उडवून विजयी सलामी दिली. अन्य लढतींत उत्तर प्रदेशाने पंजाबचा  52-36 तर हिमाचल प्रदेशने चंदिगडचा 77-15 असा सहज पराभव केला. या स्पर्धेतील प्राथमिक लढतींची संख्या अधिक असल्याने त्या आजपासून सुरू करण्यात आल्या.  2020 च्या गुवाहाटी, खेलो युथ गेम’मध्ये महाराष्ट्राने 78 सुवर्णपदके पटकावून पहिले तर हरयाणाने 68 सुवर्णपदके पटकावून दुसरे स्थान पटकावले होते. यंदा जेतेपद राखण्यासाठी महाराष्ट्र संघाने आपले  जलतरणपटू, नेमबाज आणि वेटलिफ्टर्स यांच्यावर अधिक लक्ष देत स्पर्धेत आपले दमदार पाऊल ठेवले आहे.