60 बालकलाकारांचे महानाटय़

‘सुंदर ती दुसरी दुनिया’ चे 3 आणि 17 डिसेंबरला प्रयोग

सोशल मीडिया, इंटरनेट, रिल्सच्या युगात लहान मुले त्यांचे बालपण विसरत आहेत. सुट्टीच्या दिवसांत मित्रमैत्रिणींसोबत दिवसभर हुंडाळणे, विटीदांडू असे अनेक खेळ तर कालबाह्य झाले आहेत. हल्लीच्या लहान मुलांना या खेळांची नावेही माहीत नाहीत. स्पर्धेच्या नावाखाली मुलांची केवळ धावपळच सुरू आहे. या सगळ्यात मुलांची हिरावलेली निरागसता परत मिळवून बालपणात घेऊन जाणारे ‘सुंदर ती दुसरी दुनिया’ हे धमाल नाटक नाटय़रसिकांच्या भेटीला आले आहे. वेध थिएटर निर्मित, अपूर्वा प्रॉडक्शन प्रस्तुत या दोन अंकी महाबालनाटय़ात 60 बालकलाकार आहेत. डॉ. समीर मोने लिखित या नाटकाची संकल्पना संकेत ओक यांची असून निर्मिती सुमुख वर्तक यांनी केली आहे तर टीम वेधने ‘सुंदर ती दुसरी दुनिया’चे दिग्दर्शन केले आहे.

नाटकाबद्दल सुमुख वर्तक म्हणाले, लहान मुलांसोबत मोठय़ांनासुद्धा त्यांच्या बालपणात घेऊन जाणारी ही कलाकृती आहे. नाटय़गृहातून बाहेर पडताना प्रत्येक बालक एक सकारात्मक संदेश घेऊन निघेल. ठाणे, डोंबिवलीला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता हा प्रयोग 3 डिसेंबर रोजी बोरिवली येथील प्रबोधनकर ठाकरे नाटय़गृह आणि 17 डिसेंबर रोजी ठाणे येथील काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात सकाळी 11 वाजता होणार आहे. या नाटकात आणखीन एक वेगळा प्रयोग केला आहे, तो म्हणजे प्रत्येक प्रयोगागणिक या बालनाटय़ात बालकलाकार वाढणार आहेत. 17 डिसेंबरच्या प्रयोगात 120 बालकलाकार रंगत आणणार आहेत.