
पाणीटंचाईमुळे हैराण झालेल्या तालुक्यातील नऊ वाड्यांमधील नागरिकांच्या जीवाशी जिल्हा प्रशासनाने खेळ सुरू केला आहे. या वाड्यांना भंगार टँकरमधून पाणीपुरवठा केला जात असून पाण्याला केमिकलची दुर्गंधी येत आहे. त्यामुळे हे पाणी ग्रामस्थांना पिण्यासाठी वापरता येत नसून पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना भटकंती करावी लागत आहे. जिल्हा प्रशासनाच्या या गलथान कारभाराविरोधात ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मुरबाड तालुक्यातील २२ गावे आणि ४३ वाड्यांची तहान भागवण्यासाठी शासकीय यंत्रणा कोट्यवधी रुपये खर्च करत असली तरी या भागातील पाणीटंचाई अद्याप कमी झालेली नाही. तीव्र पाणीटंचाई असलेल्या झाटघर, बांगरवाडी, केव्हारवाडी, भुवन, वाघवाडी, तोंडलीपडा, खानिवरेवाडी, साकुर्ली वाडी, गणेशपूर या नऊ वाड्यांना दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. माणसी २० लिटर पाणी हा निकष ठेवण्यात आला आहे. या वाड्यांना पाणीपुरवठा करणारे टँकर हे भंगार आहेत. टँकरमधून आणण्यात आलेल्या पाण्याला केमिकलची दुर्गंधी येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना हे पाणी पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी वापरता येत नाही. या केमिकल्युक्त पाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
‘हर घर जल’ योजना कागदावर
मुरबाड तालुक्यातील सुमारे २०६ गावातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी शासनाने जलजीवन योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा विभागाच्या संगनमताने ‘हर घर नल, हर घर जल’ हे अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक गावात कोट्यवधी रुपयांच्या योजना कागदावर राबवून ठेकेदाराने तांत्रिक अडचणी पुढे करत आपली बिले पदरात पाडून घेतली आहेत.
प्रशासनाची सारवासारव
मुरबाड तालुक्यातील टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा करण्यासाठी आलेले टँकर हे धुवून स्वच्छ केले आहेत. याच टँकरमधून टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा केला जात आहे. या टँकरमधून पुरवठा होत असलेले पाणी पिण्यायोग्य आहे की नाही याची शहानिशा करण्यात येईल, अशी सारवासारव मुरबाड पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता जगदीश बनकरी यांनी केली आहे.

























































