‘पंतप्रधान आवास’ योजनेतंर्गत चौघांची फसवणूक; सोलापूर मनपाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बनावट पावत्या व शिक्क्यांद्वारे महापालिकेतील ‘प्रधानमंत्री आवास योजना’ कार्यालयातील तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चार लाभार्थ्यांची सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सदर बझार पोलिसांत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहित शिवाजी चव्हाण (रा. सुरवसेनगर, कुमठा नाका) याच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. गौरप्पा तुकाराम गायकवाड (रा. सिद्धार्थनगर, कुमठे गाव) यांनी फिर्याद दिली आहे.

गायकवाड यांनी ऑक्टोबर 2016मध्ये ‘प्रधानमंत्री आवास योजने’अंतर्गत महापालिकेतील प्रधानमंत्री आवास योजना कार्यालय येथे संपर्क साधून अर्ज केला होता. त्यांनी एक लाख 33 हजार रुपये भरले. ही रक्कम, प्रोसेसिंग फी व फॉर्मची रक्कम मिळाल्याचे व योजना मंजूर झाल्याचे पत्र अधिकाऱ्यांनी त्यांना दिले. याकरिता कागदपत्रांवर बनावट सही व शिक्के करून दिले.

या योजनेकरिता गायकवाड यांचे नातेवाईक भारत ज्ञानदेव सुरवसे यांच्याकडून एक लाख 70 हजार, दत्तात्रय नागनाथ आठवडे यांचे एक लाख 31 हजार व शब्बीर दस्तगीर तांबोळी यांच्याकडून एक लाख 82 हजार 400 रुपयांची रक्कम घेऊन बनावट सही-शिक्क्यांची कागदपत्रे दिली. या प्रकरणात रोहित चव्हाण हा प्रमुख आरोपी असून, तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2016 ते 2022 या कालावधीत हा घोटाळा झाला असून, प्राथमिक तपासात सहा लाख 14 हजार 400 रुपयांचा अपहार झाला आहे.