
‘‘हिंदुस्थान-पाकिस्तानमधील युद्ध माझ्यामुळेच थांबले. मी टॅरिफ लादण्याचा दम भरल्यानंतर मोदींनी स्वतः फोन करून युद्ध थांबवत असल्याचे मला सांगितले होते,’’ असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केला. त्यांच्या या दाव्यामुळे भाजप, भक्त आणि केंद्र सरकारची पुन्हा गोची झाली आहे.
डोनाल्ड ट्रम्प हे जिथे जातील तिथे हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धबंदीवर बोलत आहेत. आज ते रियाधमध्ये ‘यूएस-सौदी इन्व्हेस्टमेंट फोरम’च्या व्यासपीठावर यावर बोलले. ‘‘युद्ध करणाऱया हिंदुस्थान-पाकिस्तानला मी 350 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिली होती. त्यामुळे ते विचारात पडले. असे करू नका अशी विनंती दोन्ही देशांच्या नेत्यांनी मला केली. पण मी ठाम राहिलो. तुम्ही विचार करून माझ्याकडे या. तुम्हाला युद्ध करू देणार नाही. लाखो लोकांचे जीव घेऊ देणार नाही,’’ असे मी ठणकावले. त्यानंतर मोदींनी स्वतः मला फोन केला. आमचं काम झालं आहे, आम्ही आता युद्ध थांबवत असल्याची माहिती त्यांनी दिली. पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांनीही युद्ध थांबवल्याबद्दल माझे आभार मानले, असे ट्रम्प यांनी सांगितले. हिंदुस्थानने 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि 10 मे रोजी युद्ध थांबले.
‘‘मोदींनी मला फोन केला. म्हणाले, आमचं काम झालं. मी म्हणालो, तुमचं काय काम झालं? त्यावर मोदी म्हणाले, आम्ही युद्ध करणार नाही.’’

























































