
हिंदुस्थानाने दहशतवादाविरोधात कडक कारवाई सुरु केली आहे. आज आपण दहशवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारत आहोत. देशाचे हित जपण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत कोणत्याही प्रकारे तडजोड केली जाणार नाही, हे आता जगाला कळून चुकले असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद मोदी यांनी येथे केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जैसलमेर येथील लोंगेवाला येथे सीमा सुरक्षा दल आणि हिंदुस्थानी लष्करासह दिवाळी साजरी केली. यावेळी जवानांशी बोलताना त्यांनी वरील प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी हिंदुस्थानी जवानांच्या पाठीवर शाबासकीची थाप देखील मारली. आज दुश्मांना उत्तर देण्याची ताकद आणि राजकीय इच्छाशक्ती आपल्यात आहे. हिंदुस्थानची ही शान आणि शक्ती आपल्या जवानांच्या पराक्रमामुळे आली असल्याचे गौरवाद्गार देखील त्यांनी काढले. त्यामुळेच आपण जागतिक व्यासपीठांवर प्रखरतेने आपली बाजू मांडू शकतो. हिंदुस्थान समजून घेणे आणि समाजवण्यावर विश्वास ठेवते. आम्हांला जर आजमवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना उत्तर तितक्याच ताकदीनिशी देऊ असा इशाराही पंतप्रधानांनी दिला.
चीनला दिल्ला सज्जड दम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या भूमिकेवर कडाडून टीका केली. आज संपूर्ण जग विस्तारवादी ताकदींमुळं वैतागला आहे. ही विस्तारवादी वृत्ती एक प्रकारे मानसिक विकृती असून ती 18 व्या शतकातील विचार दर्शवते. हिंदुस्थान या विचारांच्या विरोधात प्रखर आवाज बनला आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आत्मनिर्भरतेकडे यशस्वी वाटचाल
हिंदुस्थान आज संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे. आपल्या तिन्ही दलांनी यापुढै 100 हून अधिक हत्यार आणि दारुगोळा परदेशातून न मागविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाला मी शुभेच्छा देतो. त्यांच्या या निर्णयानंतर देशातील सुजाण नागरिक देखील लोकलसाठी वोकल होतील, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.


























































