दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत हिंदुस्थान-चीनचे एकमत

सामना ऑनलाईन । बिश्केक

किर्गिस्तानची राजधानी बिश्केकमध्ये शांघाय सहकार्य शिखर परिषदेसाठी उपस्थित असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनफिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. या चर्चेत पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाचा मुद्दाही चर्चेला आला. पाकिस्तानने दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा दोन्ही देशांनी व्यक्त केली आहे. हिंदुस्थानकडून दहशतवादमुक्त क्षेत्र बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पाकिस्तानकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले. दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत दोन्ही देशांचे एकमत झाले आहे. दोन्ही देशातील संबंध अधिक दृढ करण्यावरही दोन्ही नेत्यांनी भर दिला.

दोन्ही देशातील संबंध अधिक दृढ झाल्यास विकास झपाट्याने होणार आहे. त्यासाठी दहशतवादापासून क्षेत्र मुक्त करण्याची गरज दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली आहे, असे परराष्ट्र व्यवहार सचिव विजय गोखले यांनी सांगितले. दोन्ही देशातील संबंध दृढ करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी जिनपिंग यांना हिंदुस्थान भेटीचे निमंत्रण दिले आहे. जिनपिंग यावर्षी हिंदुस्थानला भेट देणार आहेत. दोन्ही देशातील संबंध दृढ होत असल्याने अनेक प्रलंबित समस्या मार्गी लागल्या आहेत. बँक ऑफ चाइनाच्या शाखा हिंदुस्थानात सुरू करण्यावर आणि मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषीत करण्यावर एकमत झाल्याचे गोखले यांनी सांगितले. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. पाकिस्तानने दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याची गरज दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली आहे. या भेटीवेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लगार अजित डोवालही उपस्थित होते.

हिंदुस्थान-चीन मैत्रीला 70 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने दोन्ही देशांमध्ये 70 विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील 35 कार्यक्रम चीनमध्ये तर 35 कार्यक्रम हिंदुस्थानात होणार आहेत. दुसऱ्यांदा पंतप्रधानपद स्वीकरल्यानंतर मोदी यांनी जिनपिंग यांची घेतलेली ही पहिलीच भेट आहे. दोन्ही देशांनी परस्पर सहकार्य वाढवण्यावर भर दिला आहे. ही भेट सकारात्मक झाली असून दोन्ही देशातील आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होतील असे मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियांचे राष्ट्रपती ब्लादिमेर पुतीन यांची भेट घेऊन त्यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केल्याचे गोखले यांनी सांगितले.