मुंडेंच्या कर्मभूमीत मोदींची सभा, महायुतीच्या उमेदवारांला निवडून देण्याचे आवाहन

19381

राज्यभरात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वाधिक चर्चत असणाऱ्या बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या महायुतीच्या उमदेवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परळीत सभा झाली. बीड जिल्हा हा नेहमीच महायुतीचा बालेकिल्ला राहिला आहे. यावेळी विक्रमी मतदान करत महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजया करा असे आवाहन मोदींनी केले. तसेच महिलांनी रेकॉर्ड मतदान करावे असे प्रतिपादन त्यांनी केले. महादेवाचे नमन करत त्यांनी आपल्या भाषणाची मराठीत सुरुवात करून उपस्थितांचे मन जिंकले.

आपल्या भाषणात विरोधकांना धारेवर धरत त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस थकलेले विरोधक आहेत अशी खोचक टीकाही केली. थकलेल्या, आत्मविश्वास हरवलेल्या विरोधकांकडून जनतेने काय अपेक्षा करावी. महायुतीची कार्यशक्तीच देशाला पुढे घेऊन जाईल,असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. देशातील महायुती सरकारकडून लोकांना अपेक्षा आहेत त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

प्रचारसभेच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. मी आज परळी प्रभू वैद्यनाथाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत तर आलोच आहे. शिवाय ही भूमी म्हणजे माझे मित्र गोपीनाथ मुंडे यांची कर्मभूमी आहे. या ठिकाणी देव आणि माझ्या समोर असलेला हा प्रचंड जनसमुदाय यांचे मला एकाच वेळेला दर्शन झाले आहे. आमच्या सरकारने रद्द केलेला 370 कलमावर विरोधक चेष्टा टीका करतात. मात्र जनता त्यांना उत्तर देईल आणि त्याची वेळ आता आली आहे. लोकतंत्र संपले असे वातावरण विरोधकांनी केले आहे? तुम्हीच सांगा देशातील लोकतंत्र संपली का? असा सवाल पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना केला असता त्यांनी याला स्पष्ट नकार दिल्याचे दिसून आले.

आपली प्रतिक्रिया द्या