ममतादीदी एवढ्या बदलतील याची कल्पनाही केली नव्हती : नरेंद्र मोदी

सामना ऑनलाईन । वाराणसी

वैयक्तीक संबंध आणि व्यवहार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कोणत्याही व्यक्तीशी आमचे शत्रुत्व नाही. आमची लढाई वैचारीक आहे. ही लढाई निःपक्ष आणि सकारात्मक असली पाहिजे असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, ममता दीदी एवढ्या बदलतील याची आपण कल्पनाही केली नव्हती.

ममता बॅनर्जी ज्या मुद्द्यांच्या जोरावर डाव्यांच्या विरोधात निवडून आल्या होत्या. सत्ता आल्यावर त्यांना त्याच मुद्द्यांचा विसर पडला याबाबत खेद असल्याचे ते म्हणाले. पश्चिम बंगालमधील हिंसाचार रोखण्यासाठी बांग्लादेशींना हाकला, अशी मागणी ममता बॅनर्जी करत होत्या. 2009 मध्ये संसदेत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. पश्चिम बंगालमध्ये निःपक्ष वातावरणात निवडणुका घेण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी त्यांची मागणी होती. राज्यात लष्कराचे जवान तैनात करा आणि नंतरच निवडणुका घ्या अशी मागणी त्या करत होत्या. मात्र, आजची पश्चिम बंगालची परिस्थिती पाहिल्यावर आश्चर्य वाटते. पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत आहे. जनतेची मुस्कटदाबी होत आहे. जनतेवर दबाव टाकण्यात येत आहे. त्यामुळे ममता दीदी एवढ्या बदलल्या कशा असा प्रश्न आपल्याला पडतो. ममता बॅनर्जी यांच्याबाबत केलेला आपला विचार अयोग्य होता, असे ते म्हणाले. ममता दीदी आता खूप बदलल्या आहेत. आमचे व्यक्तीगत संबंध चांगले असले तरी आमच्यात वैचारीक मतभेद असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले.

आम्ही कोणालाही शत्रू मानत नाही. व्यक्तीगत स्तरावर आम्ही कोणालाही विरोध करत नाही, हे आमचे धोरण आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये व्यक्त केलेले मत हीच आमची विचारसरणी आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे कोणाचाही द्वेष न करता निःपक्षपणे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.