सुरक्षेतील त्रुटी ही चिंताजनक बाब, या घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाब दौऱयादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतीत सुरक्षाविषयक त्रुटींची समोर आलेली बाब अत्यंत चिंताजनक असून या संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे, अशा शब्दांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, पंतप्रधान हे एखाद्या पक्षाचे नसून देशाचे असतात याचे भान सगळय़ांनीच ठेवले पाहिजे. पंतप्रधान पदावरील व्यक्तीची सुरक्षा हा गांभीर्याने घेण्याचा विषय आहे, सहजतेने घेण्याची ही बाब नव्हे. आपल्या देशाने सुरक्षेतील त्रुटींमुळेच याआधी दोन पंतप्रधान गमावले आहेत हे विसरून चालणार नाही. पंतप्रधान पदावरील व्यक्तीच्या सुरक्षेतील त्रुटी ही चिंताजनक बाब असून या घटनेची जबाबदारी केंद्र आणि राज्यांनी एकमेकांवर न ढकलता नक्की काय घडले हे देशासमोर आणायला हवे.

पंजाबमधून आपण सुखरूप आलो आणि जिवावरच्या संकटातून बचावलो असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. हा संदर्भ देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या या भावना देशवासीयांची चिंता वाढविणाऱया आहेत. यापुढे अशा घटना घडणार नाहीत याची काळजी सर्वांनीच घ्यायला हवी. मी पंतप्रधान मोदी यांना उत्तम दुर्घायुष्य लाभो, अशी आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.