हिंदुस्थानची आर्थिक घोडदौड पुन्हा सुरू होईल; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

574

कोरोनाच्या जागतिक संकटामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या सर्व आव्हानांचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारने ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाची सुरुवात केली आहे. देशाची अर्थव्यवस्था लवकरच रुळावर येईल आणि हिंदुस्थानच्या आर्थिक घोडदौड पुन्हा सुरू होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) वार्षिक कार्यक्रमात व्यक्त केला. सीआयआय ला 125 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

देश आत्मनिर्भर बनवण्यासाठी पाच गोष्टीवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. त्यात Intent, Inclusion, Investment, Infrastructure आणि Innovation यांचा समावेश आहे. या संकटाच्या काळात अशाप्रकारचे ऑनलाइक कार्यक्रम होत आहेत. आपण कुठेही न थांबता आपली वाटचाल करत आहोत. हीच आपली मोठी ताकत आहे. आपल्याला कोरोनाशी लढण्यासोबतच जनतेच्या जीविताची काळजी घेत अर्थव्यवस्थेलाही गती देणे गरजेचे आहे. आपण लवकरच अर्थव्यवस्था रुळावर आणू आणि ती गतीमान करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्याला देशाची क्षमता, बुद्धिमत्ता आणि टेक्नॉलॉजीवर पूर्ण विश्वास आहे. कोरोनाच्या संकटामुळे अर्थव्यवस्थेची गती धीमी झाली आहे. मात्र, आपली वाटचाल सुरू आहे, असे ते म्हणाले. मोदी सरकारने 20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा उद्योगपतींसोबत होणार हा पहिलाच कार्यक्रम आहे. सरकार उद्योगपतींसोबत असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. तुम्ही एक पाऊल पुढे टाका, सरकार चार पावले पुढे येईल, असे ते म्हणाले.

आता आपण लॉकडाऊनच्या टप्प्यातून बाहेर पडून आता अनलॉकच्या टप्प्यात आलो आहोत. त्यामुळे लॉकडाऊनकडून आता अनलॉककडे जात असताना आपल्याला गती वाढवावी लागणार आहे. कोरोना जगभरात थैमान घालत असताना सरकारने मोठे निर्णय घेतेले. योग्य वेळी देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला. याकाळात जनतेला सोयीसुविधा मिळतील, याचीही काळजी घेण्यात आली. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत आपली देशाची स्थिती ठीक आहे. आता आपल्याला लॉकडाऊनमधून बाहेर पडावे लागेल. अर्थव्यवस्थेला गती देऊन ती मजबूत करण्याला सरकारचे प्राधान्य आहे. त्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. काही दीर्घकालीन योजनांचाही विचार करण्यात येत आहे. प्रधानमत्री गरीब कल्याण योजनेतंर्गत 74 कोटी लोकांना घरापर्यंत धान्य पोहचवण्यात आले. प्रवासी श्रमिकांना मोफत रेशन देण्यात येत आहे. आतापर्यंत गरीब कुटुंबांच्या बँक खात्यात 53 हजार कोटी रुपये जमा करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. तसेच लॉकडाऊनच्या काळात 8 कोटी गॅस सिलिंडर मोफत देण्यात आले. खासगी क्षेत्रातील 50 लाख कर्मचाऱ्यांचा 24 टक्के ईपीएफओ सरकारने भरला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या