
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाची पद्धत सारखी आहे. ते एका जागेवरून यंत्रणेवर लक्ष ठेवत आहेत. मुख्यमंत्री बाहेर पडले की यंत्रणेवर ताण येतो, अधिकाऱ्यांची गर्दी होते. हे टाळण्यासाठी काही प्रोटोकॉल पाळले जात असल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नसल्याची टीका विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे. या टीकेला शिवसेना नेते संजय राऊत यांनी उत्तर दिले. ज्या प्रकारे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, अशा परिस्थितीत मुख्यमंत्री बाहेर पडले की यंत्रणेवरील ताण वाढतो, गर्दी होते. पंतप्रधान, राष्ट्रपती प्रोटोकॉल तोडत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी का तोडावा? असं ते म्हणाले.
मंदिर प्रकरणी संयम बाळगा
जनतेचं हित लक्षात घेऊन सरकारनं मंदिरांबाबत निर्णय घेतला आहे. सरकारला मंदिरं बंद करण्याची हौस नाही. फक्त राजकारणासाठी विरोध करू नये. मंदिरं उघडली जावीत ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मनापासून इच्छा आहे. विरोधकांनी याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली पाहिजे. रस्त्यावर उतरुन संकट वाढवू नये. संयम बाळगणं गरजेचं असल्याचे त्यांनी सांगितले.
- मुख्यमंत्र्यांनी कुठे बसून काम करावं हा त्यांचा अधिकार आहे. एका जागेवर बसून कामाची व्याप्ती वाढवून काम करण्याची डिजिटल इंडियाची संकल्पना नरेंद्र मोदींचीच आहे. मुख्यमंत्र्यांच्या कामाच्या पद्धतीवर टीका करणाऱ्यांनी आधी मोदींना संपूर्ण देश पालथा घाला, असं सागण्याचं धाडस करावं, असा टोला संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला.
























































