
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘रॉयल ऑर्डर ऑफ पोलर स्टार कमांडर ग्रॅण्ड क्रॉस’ या स्वीडनच्या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले. पंतप्रधान मोदी हे स्वीडनच्या दौऱयावर असून गोथेनबर्ग येथे आयोजित समारंभात स्वीडनच्या राजकन्या व्हिटोरिया यांच्या हस्ते त्यांना आज या सन्मानाने गौरविण्यात आले. यावेळी स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांच्यासह स्वीडनचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. एखाद्या देशाच्या प्रमुखाला देण्यात येणारा हा स्वीडनचा सर्वोच्च सन्मान आहे.
पंतप्रधान मोदी हे नेदरलँड्सचा दौरा आटोपून स्वीडनला रवाना झाले होते. यापूर्वी त्यांनी 2018 मध्ये स्वीडनला भेट दिली होती. पंतप्रधानांचे विमान स्वीडनच्या सीमेत दाखल झाले त्यावेळी स्वीडनच्या लढाऊ विमानांनी पंतप्रधानांच्या विमानाला सुरक्षा दिली. स्वीडनचे पंतप्रधान क्रिस्टरसन यांनी पंतप्रधान मोदींचे गोथेनबर्ग विमानतळावर स्वागत केले. स्वीडनमधील अनिवासी हिंदुस्थानी नागरिकांनी पंतप्रधानांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून स्वागत केले.


























































