
कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आज तब्बल अर्धा तास टेलिफोनवर चर्चा झाली. यावेळी पाकिस्तानचे नाव न घेता मोदी यांनी काही नेते हिंदुस्थानविरोधात हिंसेचा मार्ग अवलंबत आहेत हे ट्रम्प यांच्या निदर्शनास आणले. मोदींचा निशाणा अर्थात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर होता. .
In the context of the regional situation, PM Modi in his conversation with US President stated that extreme rhetoric & incitement to anti-India violence by certain leaders in the region was not conducive to peace. https://t.co/ydWpLrgOjX
— ANI (@ANI) August 19, 2019
जम्मू-कश्मीरमधून 370 कलम हटविल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी वारंवार युद्धाची भाषा केली आहे. त्यामुळे हिंदुस्थान-पाकिस्तानदरम्यान तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून अर्धा तास संवाद साधला. यावेळी मोदींनी पाकिस्तानकडून वारंवार चिथावणीखोर वक्तव्ये केली जात असल्याबद्दल तीक्र नाराजी व्यक्त केली. काही नेत्यांकडून हिंदुस्थानविरोधात चिथावणी देणारी वक्तव्ये केली जात आहेत. अशी वक्तव्ये दोन्ही देशांसाठी योग्य नसल्याचे मोदींनी ट्रम्प यांना सांगितले.
या संभाषणादरम्यान दहशतवाद आणि हिंसामुक्त वातावरण निर्माण करण्यावर मोदींनी जोर दिला. अशा वातावरणात सीमेपलीकडील दहशतवादाला कोणतेही स्थान नसावे, असेही मोदींनी स्पष्ट केले. तसेच गरिबी, शिक्षणाचा अभाव आणि आरोग्याच्या प्रश्नांशी झुंज देणाऱया देशांसोबत हिंदुस्थान नेहमीच सहकार्याची भूमिका घेत आला असून या पुढेही घेत राहणार आहे असे सांगतानाच मोदींनी यावेळी अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होत असल्याचाही उल्लेख केला. यावेळी द्विपक्षीय संबंध आणि व्यापारी संबंधावरही चर्चा झाली.
























































